लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या २५ ते ३० कर्मचाऱ्यांना ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्यालयातील शिबिरात बोलाविण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील वसूलदारांना ‘खाकी’च्या कर्तव्याची जाणीवही करून दिली जाणार आहे.
बहुतांश पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना तंबी देताच या कर्मचाऱ्यांना शिबिरासाठी मुक्तही करण्यात आले आहे. सोमवारपासून शिबिराला सुरुवात झाली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या अनोख्या उपक्रमाने जिल्ह्यातील पोलीस दलात सध्या खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दि. ९ ऑक्टोबर रोजी अधीक्षक कार्यालयाचा पदभार स्वीकारला. पदभार घेतल्यानंतर त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीमध्ये कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील २५ पोलीस स्टेशनला भेटी देऊन त्यांनी पाहणी केली. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा अंदाज घेत त्यांनी हळूहळू आपल्या कामाची चमक दाखविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात वसूलदार म्हणून ओळख असलेल्या २५ ते ३० कर्मचाऱ्यांची यादी तयार केली. या कर्मचाऱ्यांना तत्काळ शहरातील ग्रामीण मुख्यालयात शिबिरासाठी (कोर्स) हजर राहण्याचे आदेश दिले. आदेश प्राप्त होताच वसूलदारांनी सोमवारी तत्काळ ग्रामीण मुख्यालय गाठले.
या शिबिराला सुरुवात झाली असून, त्याचा कालावधी कमीत कमी पंधरा दिवसांचा आहे. शिबिरात खात्यांतर्गत आपल्या कर्तव्याची उजळणी करून घेतली जाते. शिबिरांमध्ये कर्मचाऱ्यांत फरक पडला असे वाटले तर त्यांना पुन्हा संबंधित पोलीस स्टेशनला पाठवले जाते, अन्यथा या शिबिराचा कालावधी वाढू शकतो आणि तो महिना-दीड महिना, दोन महिने, सहा महिने किंवा वर्ष असासुद्धा होऊ शकतो. थोडक्यात ग्रामीण मुख्यालयाला बदली केल्यासारखा हा प्रकार आहे.
अन्यथा अधिकाऱ्यांना व्हावे लागले असते हजर..
-पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी २५ ते ३० कर्मचाऱ्यांना शिबिरासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. कर्मचारी हजर न झाल्यास त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसापूर्वीच पोलीस ठाण्यातून मुक्त केले आणि सुटकेचा नि:श्वास टाकला.
तुम्हीच तुमच्या नोकऱ्या सांभाळा !
- पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर बहुतांश वसूलदारांनी आपल्या अधिकाऱ्यांकडे विनंती केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी हात वर करत काही करता येणार नाही, मॅडम खूप कडक आहेत. तुम्ही तुमच्या नोकऱ्या सांभाळा असे म्हणत हात वर केल्याची चर्चा ग्रामीण पोलीस दलात रंगली आहे.
काट्याने काढला काटा..
- हे कर्मचारी वसूलदार असल्याची कोठेही कागदोपत्री नोंद नसते. त्यामुळे थेट कारवाई करता येत नसते. मात्र हे शिबिरही या वसूलदारांना ‘सरळ’ करण्यासाठी असल्याची कुठे नोंद नाही. त्यामुळे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करणाऱ्या या वसूलदारी प्रवृत्तीचा परस्पर काट्याने काटा काढला जात असल्याची खुमासदार चर्चाही रंगली आहे.