साेलापूर : मराठा आरक्षणासाठी मनाेज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये २० जानेवारीपासून राेजी हाेणाऱ्या आंदाेलनात जिल्ह्यातील शेकडाे समाज बांधव सहभागी हाेणार आहेत. या आंदाेलनाच्या तयारीसाठी शुक्रवारपासून जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये बैठकांचे आयाेजन करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांनी गुरुवारी दिली.
माउली पवार म्हणाले, राज्य सरकार अजूनही मराठा आरक्षणाबद्दल गंभीर नाही. केवळ तारखा देण्याचे काम सुरू आहे. मुंबईच्या आंदाेलनात जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभाग घ्यावा यासाठी आम्ही सर्व तालुक्यातील प्रमुख समन्वयक मंडळी यांच्याशी चर्चा करीत आहाेत. अकलूजमध्ये शुक्रवारी दुपारी १२ वाजता बैठक हाेईल. त्यानंतर माेहाेळमध्ये सायंकाळी चार वाजता बैठक हाेईल. शनिवारी मंगळवेढा, सांगाेला, पंढरपूर तालुक्यात बैठक हाेणार आहे.
रविवारी वडाळा, बार्शी, करमाळा, माढा, अक्कलकाेट येथे बैठक हाेणार आहे. साेमवारी अक्कलकाेट आणि साेलापूर शहरात दाेन ठिकाणी बैठका हाेणार आहेत. सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक या बैठकांना मार्गदर्शन करतील. साेलापूर जिल्ह्यात शेकडाे वाहने मुंबईत दाखल हाेतील. जितके दिवस मनाेज जरांगे यांचे आंदाेलन चालेल तितके दिवस मुंबईत राहण्याचा आमचा निर्धार आहे, असेही पवार यांनी सांगितले.