सांगोला : उजनीच्या पाणीप्रश्नावर बोलताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय अजिबात सहन केला जाणार नाही. याबाबत मी मुख्यमंत्र्याकडे वस्तुस्थिती मांडून सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे एक थेंब पाणीही इतरत्र वळवू देणार नाही. कोणी असा विचार जरी केला तरी त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला आहे.
सध्या उजनी धरणाचे ५ टीएमसी पाणी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वळवले असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
१९९८ साली मी आमदार असताना तत्कालीन पाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर यांनी सांगोला तालुक्यासाठी उजनी धरणातील २ टीएमसी पाणी मंजूर केले होते, परंतु २०१९पर्यंत या योजनेचे काम सुरू होऊ शकले नव्हते.
आता या २ टीएमसी पाण्यातून सांगोला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील २२ वंचित गावांना पाणी देण्याचा सुमारे ४०० कोटी खर्चाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. गेले वर्षभर या कामाचा पाठपुरावा सुरु आहे. थोड्याच दिवसात या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून निधीची तरतूद करून कामाला सुरूवात होईल. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी इतरत्र नेण्यास माझा तीव्र विरोध राहील.
----
सांडपाणी उल्लेख मान्य नाही
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांडपाण्याच्या अनुषंगाने केलेले वक्तव्य तात्त्विकदृष्टय़ा पटत नाही. आम्हाला ते मान्य नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आम्ही इतरत्र कोणालाही नेऊ देणार नाही, असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
----