‘अण्णा, आप्पा, आजी तुम्ही फकस्त सांगा आमी तुमच्या सेवेला हजर आहे’ आश्वासनांच्या खैरातीला तर तोडच नाही. पुण्या-मुंबईला गेलेल्या मंडळींना मतदानाला परत येण्याचे आवतान देण्यात येऊ लागलंय. साराच माहोल आता निवडणूकमय होऊ लागलाय. जिवाभावाची भावकी, आप्तेष्ट सत्तेच्या सारिपटासाठी आमने-सामने उभे ठाकले आहेत. हे सारंच अघळपघळ बघून गावोगावी पारावरच्या गप्पांनाही उधाण आलं आहे. गावातला मुरब्बी इरसाल दामूतात्या म्हणतो कसा ‘मर्दानू या पुढारी आन् उमेदवारासनी आपल्याबद्दल लई पिरेम ऊतू चाललंय लेका’ यावर एकच हशा पिकला अन् शिरपा सकट म्हणाला ‘तात्या पुढच्या पाच-सात दिवस हे असंच चालणार.. आता जेवणावळीलाबी रंगत येणार बगा’
‘ह्यूद्या काय व्हायचाय त्ये. पण नक्की आपल्या मदतीला जो मानूस ईल त्यलाच आपून निवडून द्यायला पाहिजे’ - कॉलेजात जाणारा धोंडिबामामाच्या उमेशनं आपलं म्हणणं मांडलं.
पारावरच्या मंडळींनी उमेशच्या म्हणण्यावर माना डोलावल्या. ‘हे म्हणणं मातूर आक्षी खराय बाबानू’ दामूतात्यानंही मान डोलावत आपला होकार कळवला.
आरं पण अण्णा, आप्पा, दादा, मामांना चालंल का? खालच्या गल्लीचा नामू बंडगर उद्गारला. ‘ये गप्प रं तू. तुजं एक मधीच कायतर असतंय बग.. आपून कुटं कुणाला इरोध करालाव.. आपल्याला फकस्त आपल्या कामाला येणाऱ्या मानसला निवडायचं एव्हढचं बोलायलाव की. दामूतात्या खराय का? न्हाय.
व्हयऽ व्हयऽऽ खराय रं नामू तुजं.. दुसरीकडं कुटं कायबी ह्यूद्या. आपल्या गावात काम करणाऱ्याच मतं द्यायची. समद्यानी गल्ल्या वाटून घ्या आन् लागा कामाला म्हणत दामूतात्यानं चंचीतली तंबाखू काढून बार भरला अन् एकेक करीत पारावरून घराकडे वळले...
- इल्लूभाई