सोलापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीत भेटवस्तू म्हणून सुकामेवा देण्याकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. यंदा सुकामेव्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे, तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे सुकामेव्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे यंदा सर्वसामान्यांची दिवाळी आरोग्यदायी आणि गोड होणार आहे.
दरवर्षी दिवाळीनिमित्त विविध कंपन्या, संस्थांकडून नजीकच्या व्यक्तींसह कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. फराळ, मिठाई, तसेच विविध वापरण्यायोग्य वस्तू भेट वस्तू म्हणून देण्यात येतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोषक आहार म्हणून सुकामेवा देण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सुकामेव्याचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी या दिवाळीत बाजारातील चित्र वेगळं असते. थंडीच्या दिवसांत मोठी मागणी असलेल्या आणि दिवाळीमध्ये गिफ्ट दिल्या जाणाऱ्या सुकामेव्याच्या बाजारात मोठी तेजी असते. मात्र, यंदा कित्येक वर्षांनंतर या हंगामात सुकामेव्याचे दर घसरले आहेत.
असे आहेत किलोचे दर
- बदाम ८००-९००
- पिस्ता ९५०-१,०००
- अक्रोड १,१५०-१,२००
- काजू ७००-८००
- अंजीर ९०० - १,०००
- खिसमिस २००-२५०
- मनुके २,२०० - २,२५०
म्हणून कमी झाले दर
- यंदा सुकामेव्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे, तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी सुकामेव्याच्या दरात घसरण झाली आहे. याचा फायदा खरेदीदारांना आणि ग्राहकांना मिळत आहे. विविध प्रकारच्या सुकामेव्यात १० ते २५ टक्क्यांपर्यंत दर उतरले आहेत.
- दरवर्षी दिवाळीनिमित्त संस्था, संघटना, कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देत असतात, तसेच मित्र आणि नातेवाईकही एकमेकांना मोठ्या प्रमाणात दिवाळी भेट देत असतात. बाजारात सध्या विविध प्रकारच्या सुट्ट्या आणि पॅकिंग सुकामेव्याला मागणी वाढत आहे. मागणी वाढली असली, तरी आवक मोठ्या प्रमाणावर असल्याने दरात यंदा घसरण झाली आहे.
---
सुकामेव्याच्या दरात घसरण झाली आहे, गेल्या वर्षी मागणी वाढली होती. मात्र, यंदा बाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आवक जास्त आहे. उत्पादनही चांगले निघाल्यामुळे सुकामेव्याचे दर कमी झाले आहेत. विविध प्रकारच्या सुकामेव्यात सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत दर घटले आहेत.
- नागनाथ अक्कलकोटे, व्यापारी.
----