सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा अनुदान यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याने त्या आॅनलाईन पाठविल्या नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील अवघ्या ३७३ शेतकºयांच्या याद्या पणन मंडळाला मिळाल्या आहेत. यामुळे कांदा अनुदानाची आतुरतेने वाट पाहणाºया पात्र शेतकºयांना दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
दुष्काळामुळे होरपळणाºया शेतकºयांना बाजार समितीच्या दिरंगाईचा फटका बसत आहे. १६ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीतील ३२ हजार ७०७ शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र आहेत. या शेतकºयांसाठी शासनाने ३६ कोटी ७० लाख २९ हजार ८७४ रुपये दिले आहेत. राज्यासाठी ३८७ कोटी ३० लाख ३१ हजार रुपये अनुदान पणन संचालक कार्यालयाला जमा केले आहेत. तालुक्यातील याद्या बाजार समितीने तालुका निबंधकाकडे व तालुका निबंधकांनी पणन संचालकांनी दिलेल्या साईटवर अपलोड करावयाच्या आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने त्यास संमती द्यायची आहे. पणन संचालक कार्यालयाने अक्कलकोट,करमाळा, कुर्डूवाडी, माळशिरस व पंढरपूर या बाजार समितीच्या ३७३ शेतकºयांच्या याद्या मिळाल्याचे सांगितले; मात्र बार्शीचे ४१० व सोलापूर बाजार समितीच्या ३१ हजार ९२४ शेतकºयांच्या याद्या अद्याप मिळाल्या नसल्याचे पणन मंडळ कार्यालयाकडून सांगण्यात आले.
सोलापूर बाजार समितीच्या याद्या मिळाल्या नसल्याचे पणन मंडळ सांगत असले तरी सोलापूर शहर निबंधक नागनाथ कंजेरी यांनी मात्र याद्या आॅनलाईन केल्याचे सांगितले.
जिल्हा पातळीवर याद्यांचा घोळ सुरू असल्याने पात्र कांदा उत्पादक शेतकºयांना अनुदानासाठी तिष्ठावे लागत आहे. आॅनलाईन याद्या पुढील आठवड्यात आयसीआयसीआय बँकेला मिळाल्या नाही तर शेतकºयांचे अनुदान विधानसभा निवडणूक आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे. असे झाले तर शेतकºयांना कांदा अनुदानाची रक्कम दिवाळीपर्यंत मिळण्याची शक्यता कमीच आहे.
२९० कोटी अनुदान वर्ग - पणन मंडळाने आतापर्यंत ३८७ कोटींपैकी २९० कोटी रुपयांच्या याद्या आयसीआयसीआय बँकेला दिल्या आहेत. या याद्यानुसार आयसीआयसीआय बँक थेट शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे. राज्य शासन आतापर्यंत स्टेट बँक आॅफ इंडियामार्फत कोणतीही मदत शेतकºयांच्या खात्यावर जमा करत होते मात्र नव्याने आयसीआयसीआय बँकेमार्फत पैसे जमा करण्यात येत असल्याच्या कारणामुळेही अडचण येत आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सोलापूर बाजार समितीच्या याद्याच मिळाल्या नाहीत व याद्यात फार मोठ्या त्रुटी असल्याचे सांगितले.