सोलापूर : दुष्काळ जन्य परस्थितीमध्ये जनावरांचे प्रतिकारकशक्ती कमी होते. जनावरांना तीव्र ताप येतो, चारा खाणे बंद होते, तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते, अशी लक्षणे असल्यास लाळखुरकत आजाराचा धोका असू शकतो. त्यामुळे लस देण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
उन्हाळ्यामध्ये विविध सांसर्गिक रोग प्रादुर्भावाची शक्यता असते. त्यामुळे सर्व पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा. गाय व म्हशीमधील लाळखूरकत रोगाचे लसीकरण आणि शेळ्या मेंढ्यामधील पीपीआर लसीकरण करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ संतोष पंचपोर व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सोलापूर डॉ समीर बोरकर यांनी केले आहे.
लालखूरकत लस मात्रा ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यामध्ये ४ लाख ५० हजार डोस शिल्लक आहेत. यासोबतच पीपीआर लस मात्रांचे १० लाख ८७ हजार डोस शिल्लक असून पशुपालकांनी त्यांच्या जनावरांना लस द्यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.