याबाबत माहिती देताना नारायण पाटील यांनी सांगितले की, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नुकतीच टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा अशी सूचना तेथील संबंधित अधिकाऱ्यांना केली. याच धर्तीवर आता दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावाबाबत सूचना देण्यात याव्यात, असे म्हटले आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ७५० अश्वशक्तीचे जवळपास नऊ ऊर्जापंप कार्यरत आहेत. यामुळे विजेचा वापर जास्त प्रमाणात होतो. ही योजना पूर्णत: कार्यान्वित झाल्यानंतर १० हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तरी भविष्यकाळचा विचार करून दहिगाव येथील पंपहाऊसजवळ सौर ऊर्जा प्रकल्प तयार करून संपूर्ण योजना यावर कार्यान्वित केली गेल्यास विजेची बचत होऊन शेतकरी व शासन यांच्या वीजबिलासंदर्भात आर्थिक बचत होणार आहे. ही योजना सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी अशी मागणी आपण निवेदनाद्वारे केली असल्याचे नारायण पाटील यांनी सांगितले. या निवेदनाच्या प्रती जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठविण्यात आल्या आहेत.