बार्शी : तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत म्हटले की वादविवाद, तंटे होतात. भावकीत सुद्धा वैरत्व निर्माण होते. गावचा विकास आणि एकोपा यासाठी बार्शी तालुक्यात जास्तीत जास्त गावांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध कराव्यात, बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावांसाठी १० लाख, २० लाख व २५ लाखांचा आमदार निधी लोकसंख्येच्या प्रमाणात देण्याची घोषणा आमदार राजेंद्र राऊत यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, दहा-बारा दिवसांपासून बिनविरोध ग्रामपंचायती करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोणतेही राजकारण न आणता सर्वांना भेटून बिनविरोधासाठी चर्चा करतोय. सर्वांनी वाद टाळून एकत्र येण्याचा प्रयत्न करावा. यापैकी १५ ते २० गावे बिनविरोध होतील, असा विश्वास आहे. दोन हजार मतदारसंख्येच्या आतील ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर दहा लाख, चार हजारांच्या आतील गावासाठी २० लाख आणि चार हजारांपेक्षा जास्त मतदार असलेल्या गावांना २५ लाख रुपये आमदार निधी विकासकामांसाठी देऊ. कोरोनाचे संकट आहे. अर्थव्यवस्था मंदावली आहे. अशा काळात निवडणुकीचा खर्च परवडणारा नाही. कोणतेही राजकारण न पाहता, केंद्र व राज्य शासनाच्या जास्तीत जास्त योजना गावात राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्या गावातील लोकांनी माझ्याकडे पाठपुरावा करावा. कोणतेही राजकारण, गटतट असा विचार मनात न आणता एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून या सर्वांना सहकार्य करणार असल्याचे राऊत म्हणाले.
---
वैरागकरांच्या निर्णयाचे स्वागत
वैरागच्या सर्वपक्षीय नेत्यांनी अर्ज न दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आमदार राऊत यांनी स्वागत केले आहे. राऊत म्हणाले, सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बोललो आहे. आता ग्रामपंचायत व नंतर नगरपंचायत असा दुहेरी खर्च परवडणारा नाही.