आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, शेतकऱ्यांचा प्रश्न जाणूनबुजून लटकवला जातो़ सरकारने घेतलेला लहान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय चांगला आहे़ लहान शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे़ आज मोठमोठ्या कारमध्ये फिरून नेते, आमदार कर्जमाफी मागत आहेत, अशांना कदापि कर्जमाफी दिली जाऊ नये, असे मत औरंगाबाद एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले़ एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी यांच्या वतीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीनिमित्त आ़ इम्तियाज जलील सोलापुरात आले होते़ त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला़ यावेळी नगरसेवक अमेजा शेख, वाहिदा शेख, गाजी जहागीरदार, इरफान शेख उपस्थित होते़ प्रारंभी त्यांनी येथील कायदा, सुव्यवस्थेवर भाष्य करीत असताना महाराष्ट्रापेक्षा बिहार सुरक्षित असल्याचे म्हणाले़ पूर्वी असुरक्षित, नियमांची पायमल्ली करणारे राज्य म्हणून बिहारला ओळखले जायचे़ परंतु बिहार आज असुरक्षित आहे हा आपला गैरसमज आहे़ आज बिहारमध्ये महाराष्ट्रपेक्षा चांगली स्थिती आहे़ काही दिवसांपूर्वी नंदुरबारमध्ये एका युवकाची हत्या झाली, त्यानंतर एका ७५ वर्षीय वृद्धाला बिर्यानीचे पैसे मागितले म्हणून जिवंत जाळण्यात आले, तरीही आपण कोणी यावर काही बोलत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ यानंतर त्यांनी विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेवर भाष्य करीत असताना या यात्रेत एमआयएमलाही सहभागी होण्याचे सांगितले गेले होते. परंतु आपण सहभाग टाळल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ ऐन विधानसभेच्या तोंडावर ही संघर्ष यात्रा काढण्यात आल्याचे ते म्हणाले़ वर्षातून जेमतेम तीनवेळा विधानसभा भरवली जाते़ या काळात विरोधी पक्षाने सभागृहात उपस्थित राहणे जरुरीचे असते़ तरीदेखील याच काळात त्यांनी संघर्ष यात्रा काढली़ यादरम्यान ९ आमदारांचे निलंबनही झाले आणि सरकारचे काम संपल्यावर शेवटच्या दिवशी या आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे म्हणाले़ एमआयएम पक्ष राजकारणात सक्रिय झाल्यामुळे राजकारण्याचे धाबे दणाणले आहेत़ त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे पक्षाला अडचणीत आणण्याचे प्रकार घडत असल्याचे ते म्हणाले़
कारमध्ये फिरणाऱ्यांना कर्जमाफी नको : इम्तियाज जलील यांचे मत
By admin | Published: June 20, 2017 12:21 PM