मंगळवेढा : शेती नुकसानीच्या पाहणीचे नुसते दौरे नको, राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत जाहीर करावी. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने शेतक-यांना मदत न दिल्यास आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते रविवारी रात्री मंगळवेढा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अतिवृष्टी व महापुरामुळे राज्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना दिलासा मिळावा यासाठी तात्काळ मदत द्यावी अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. याबाबत ते म्हणाले, ‘अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोलमडलेल्या शेतक-यांना पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पातळीवर आपत्ती निवारण फ़ंड तयार करावा .सध्या या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जवळपास ५० हजार कोटीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून १५ हजार कोटी रुपये व केंद्र सरकारने केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून ३५ हजार कोटी रुपयाची भरपाई द्यावी.केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतक-यांचे नुकसान लक्षात घेऊन मदत करणे गरजेचे आहे.’ असंही ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी मागील वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. आता तर ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी. केंद्र सरकारनेही हात झटकू नयेत. सरकारने वेळीच मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून लढाई लढेल.’असेही शेट्टी म्हणाले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड.राहुल घुले, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष हर्षद डोरले, रोहित भोसले, आबा खांडेकर, संतोष बिराजदार, शंकर संघशेट्टी, रणजित बागल, आदी पदाधिकारी उपस्थित होते.