सोलापूर : ‘माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही माझ्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या ठिकाणी पवारप्रेम दाखवू नका’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील समविचारी आघाडीच्या नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील गेल्या दोन वर्षांपासून मोर्चेबांधणी करीत आहेत. यासाठी त्यांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील समविचारी आघाडीच्या नेत्यांना ताकद दिली. या महाआघाडीत आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, माळशिरसचे उत्तम जानकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर आदींचा यामध्ये समावेश होता.
माढ्यातून शरद पवार यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव पुढे केले. महाआघाडीतील नेत्यांचा अंदाज घेतला. तेव्हा एक-एक नेता अंग काढून घेत असल्याचे लक्षात आले. संजय शिंदे यांनी पवारांना सहकार्य करण्याचे सुतोवाच केले. ऐनवेळी पवारांनी माघार घेतली. या माघारीनंतर माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाली. यादरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय शिंदे यांना भाजपाकडून लढण्यास सांगितले. पण शिंदे यांनी नकार दिला. मग मुख्यमंत्र्यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपात प्रवेश दिला.
आमदार प्रशांत परिचारक सोमवारी महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित होते तर राजेंद्र राऊत करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना भेटण्यासाठी आवाटी येथे निघाले होते. यादरम्यान परिचारक यांना गिरीश महाजन यांनी फोन केला तर राऊत यांना चंद्रकांतदादांनी फोन करुन मुंबईला येण्यास सांगितले. राऊत यांनी मुंबईत पोहोचण्यास सात तास लागतील. तोपर्यंत मी इकडच्या बैठका उरकून घेतो, असे सांगितले. पण मुख्यमंत्र्यांनी सहकारमंत्री देशमुख यांच्यासोबत विमानाने या, असे सांगितले. पण सहकारमंत्र्यांच्या विमानात जागा नसल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी परिचारक आणि राऊत यांच्यासाठी स्वतंत्र विमान पाठविण्याची तयारी दाखविली. पण तोपर्यंत सुभाषबापूंच्या विमानातील जागेची अडचण दूर झाल्याचा निरोप दिला. राऊत आणि परिचारक विमानाने मुंबईला पोहोचले.
शिंदेंचा राष्ट्रवादी प्रवेश भाजपच्या जिव्हारी सोलापूर जिल्ह्यातील पारंपरिक विरोधामुळे संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली. संजयमामांचा राष्ट्रवादीतील प्रवेश भाजपच्या जिव्हारी लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता रणजितसिंह निंंबाळकर यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली आहे. निंबाळकरांचा सोमवारी भाजपा प्रवेश झाला. या कार्यक्रमाला माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, आमदार प्रशांत परिचारक, माजी आ.शहाजीबापू पाटील, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह सातारा जिल्ह्यातील काही नेते उपस्थित होते.