सोलापूर : सोलापुरातील मंगळवारची सकाळ लहान मुलांच्या भावविश्वाला तडा देणारी ठरली. ‘माय पप्पा इज द ग्रेट..’ असे आपल्या मित्रमंडळीत ठणकावून सांगणाºया मुलांच्या भावविश्वातील ‘द ग्रेट’ पप्पांची दुचाकी पोलिसांनी हेल्मेट आणि पार्किंगचे कारण सांगून पकडली. दंड न भरणाºया पालकांच्या दुचाक्या उचलून थेट पोलीस ठाण्यात नेल्या. हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यांदेखत पाहणाºया बालकांच्या भावविश्वाला मात्र तडा बसला.
‘नका नेऊ ना..ऽऽ हो पप्पांची गाडी..’ अशी विनवणी करणाºया या बालकांचे आर्जवही पोलिसी कारवाईत लोपले, बालकांच्या डोळ्यांदेखत पालकांचा झालेला हा पाणउतारा मात्र मुलांच्या चांगलाच वर्मी बसला.
लिट्ल फ्लॉवर शाळेजवळच्या छोट्याला बोळात ही कारवाई झाली. शाळेची वेळ असल्याने मुलांना पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून पालकांनी घाईगडबडीत शाळेसमोरच वाहने लावली होती. काही पालकांनी तर लगतच्या बोळात वाहने लावली होती. मात्र पोलिसांच्या पथकाने ही सर्व वाहने उचलून नेली.
बोळात लावलेली वाहनेही या कारवाईतून सुटली नाहीत. यामुळे पालकांना व लहान मुलांना त्रास झाला. त्यांना ताटकळत उभे रहावे लागले. या प्रकाराबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला. सोलापुरात मार्च एंडिंगची कारवाई नोव्हेंबरमध्येच सुरू झाली की काय, अशी शंका व्यक्त करीत अनेकांनी संताप व्यक्त केला.
पालकांच्या मते त्यांनी लावलेली वाहने पार्किंगमध्येच होती. त्यामुळे अन्य वाहनांना कसलाही अडथळा नव्हता. या ठिकाणी पालक नेहमीच वाहने लावतात आणि लवकर निघूनही जातात. मात्र शाळेला अथवा नागरिकांना कसलीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे बाजारपेठेतील गर्दी, अन्य कार्यालयांपुढे बेशिस्तपणे उभ्या राहणाºया वाहनांऐवजी शाळेत मुलांना पोहोचवायला निघालेल्या पालकांवर ही कारवाई झाली. विशेष म्हणजे सकाळी ७ ते १० या वेळेतच ही कारवाई झाली.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक शाखा यांनी मंगळवारी सकाळी संयुक्तपणे हेल्मेट सक्तीची आणि नो-पार्किंग झोनवर ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, वाहन निरीक्षक श्रीनिवास मूर्ती, उपवाहन निरीक्षक ठोंबरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भोसले व कर्मचाºयांनी ही मोहीम राबविली. कारवाईत ३३ वाहनधारकांवर हेल्मेट न परिधान केल्यासह अन्य कारणांसाठी तब्बल ७५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. पोलिसांची ही कारवाई यशस्वी झाली. दुसरीकडे मात्र पालकांची दुचाकी पोलिसांनी जप्त करून नेल्याने शाळा सुटूनही पोटात भूक घेऊन वाट पाहण्याची शिक्षा लेकरांना मिळाली.
कर्मचाºयांनो... हेल्मेट वापरा - जिल्हाधिकारी- हेल्मेट सक्ती नाही, मात्र स्वत:च्या जिवाची काळजी म्हणून हेल्मेट वापरा, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी कर्मचाºयांना केले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. त्यात पहिल्या टप्प्यात शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना हेल्मेट वापरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. नागिरकांनाही हेल्मेट वापरणे लवकरच बंधनकारक केले जाणार असल्याचा सूर आहे.
वाढते अपघात आणि दगावणारे वाहनचालक यांची संख्या पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शहरात हेल्मेट न वापरणाºया वाहनधारकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारपासून सोलापूर शहरात दररोज ही मोहीम राबविली जाणार आहे. तेव्हा शहरवासीयांनी हेल्मेटचा वापर करावा. तसेच वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावी. वाहन चालविताना स्वत:ची काळजी घ्यावी. - संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
पोलिसांनी कारवाई करताना तारतम्य बाळगावेहेल्मेट नसेल तर वाहनचालकांवर कारवाई झालीच पाहिजे. पोलिसांची भूमिका योग्यच आहे; मात्र मंगळवारची कारवाई थोडीशी खटकण्याजोगी होती. सकाळी अत्यंत प्रसन्न वातावरणात आनंदाने शाळेत चाललेल्या चिमुकल्यांसमोर त्यांच्या पालकांची गाडी जप्त करण्याची कारवाई का केली? लहान मुलांच्या मानसिकतेचाही कधी कधी पोलीस अधिकाºयांनी विचार करायला हवा, असे मत विश्वंभर पाटील या पालकाने व्यक्त केले.
कारवाई यापुढेही सुरूच - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई झाली. बेशिस्त वाहन चालविणे, मर्यादेपेक्षा अधिक जणांना वाहनांवर बसविणे, चुकीच्या मार्गाने जाणे, हेल्मेट परिधान न करणे अशा कारणावरून झालेल्या या कारवाईत एकाच दिवसात ७५ हजार रुपयांवर दंड वसूल झाला. या पुढे देखील या कारवाया चालूच राहणार असून, वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे जवळ ठेवण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने के ले आहे.