सोलापूर : अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता कुठे सोलापूर शहर पूर्वपदावर येत आहे़ त्यात पुन्हा कडक संचारबंदीची अंमलबजावणी करून सोलापूरकरांना वेठीस धरू नका़ कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा खीळ बसवू नका, सोलापूरला मागे नेऊ नका असे मत मांडतानाच शिस्त पाळू, नियमांचे पालन करू अशीही हमी सोलापुरातील नागरिकांनी लोकमत समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली. तीन महिन्यांनंतर सुरू झालेले उद्योग-व्यापार रुळावर येत असताना पुन्हा संचारबंदी लागू करण्याच्या निर्णय म्हणजे पुनश्च हरिओम.
शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता आणखी पंधरा दिवस कडक संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव आहे. दोन दिवस निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली होती, सोलापुरात १ जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करीत विविध दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच सोलापूर शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग मात्र वाढत चालला आहे. त्यात नागरिक शिस्त व नियमांचे पालन करीत नसल्याचे सांगत प्रशासनाने संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे़ त्याबाबत गुरूवारी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे, त्यानंतर संचारबंदीबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
सोलापूर शहरात पुन्हा कडक संचारबंदी करणे योग्य आहे का याबाबत उद्योजक राम रेड्डी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, सोलापुरात पुन्हा कर्फ्यू लावला तर भूकमारी होईल. प्रशासनाला संचारबंदी लागू करायची असेल तर उद्योगधंदे सोडून करा, आता कुठे उद्योगधंदे पूर्वपदावर येत आहेत, पुन्हा बंद केल्यास सोलापूर मागे जाईल. विनाकारण फिरणारे, नियमांचा भंग करणाºयांवर कारवाई करा, कंटेन्मेंट झोनवर प्रशासनाने अधिक लक्ष दिल्यास कोरोनाची रुग्णसंख्या नक्कीच थांबेल असेही त्यांनी सांगितले.
प्रसिध्द वकील अॅड. धनंजय माने म्हणाले की, मुंबई, पुण्याच्या धर्तीवर सोलापुरातही केवळ प्रतिबंधित क्षेत्र किंवा ज्या ठिकाणी कोरोनाचा जास्त प्रभाव आहे अशा ठिकाणी संचारबंदी लागू करावी. संपूर्ण शहरात संचारबंदी लागू केल्यास सोलापूरची अर्थव्यवस्था पुन्हा कोसळणार आहे.
उद्योजक केतन शहा म्हणाले की, वास्तविक पाहता सोलापुरात पुन्हा संचारबंदीची गरज नाही. प्रशासन आपल्या चुका लपविण्यासाठी जनतेवर कर्फ्यू लादत आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या घडीला रुग्ण कमी आहेत. तुरळक ठिकाणे वगळता सर्वच ठिकाणी शासकीय नियमांचे पालन होतेय, पुन्हा बंद केल्यास सोलापूरची अवस्था दयनीय होईल, अर्थव्यवस्था पूर्ण ढासळेल.
शिक्षणतज्ञ प्रा़ शशिकांत कलबुर्गी म्हणाले सोलापूरला पुन्हा संचारबंदी लागू करण्याची गरज नाही. लोक नियम पाळतात की नाही, याबाबत शासनाने लक्ष द्यायला हवे. पुन्हा संचारबंदी लावल्यास सर्वसामान्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल. प्रशासनाने बंद न करता शासकीय नियमांची लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. लोकांनीही मास्क, फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळायला हवेत.