सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाषण केले. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडल्यानंतर प्रथमच पवार हे सोलापूर आणि उस्माबाद दौऱ्यावर निघाले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. गेलेल्यांची चर्चा कशासाठी करताय? गेलेले इतिहासात जातील, असे म्हणत पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम केले.
सोलापूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लागल्याची चर्चा जिल्ह्यात चांगलीच रंगली होती. मात्र, पवार यांनी सोलापूर दौरा करुन कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली आहे. तसेच, हे गेले-ते गेले याची चर्चा करू नका. या जिल्ह्याला काँग्रेसचा मोठा इतिहास आहे. देशात 1957 मध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. त्यावेळीही, सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला विजय मिळाला होता, असा हा जिल्हा आहे. स्वाभिमानाचा स्विकार करणाऱ्या या जिल्ह्यात काहींनी लाचारीचा रस्ता स्विकारला, त्यांना जनता दारात उभं करणार नाही. त्यामुळे जे गेले ते इतिहासजमा होतील. मावळणाऱ्याकडे पाहायचं नाही, आता उगवणाऱ्याचं दर्शन घ्यायचाय, असे म्हणत पवार यांनी नाव न घेता, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि इतर नेत्यांवर टीका केली.
तसेच, मला सारखे-सारखे 80 वर्षांचे झाले, असे म्हणू नका. मी काही म्हातारा झालो नाही, समोर बसलेल्या तरुणांच्या जोरावर अनेकांना अद्यापही घरचा रस्ता दाखवला आणि अजुनही दाखवायचा आहे. आता फक्त जिंकायचे आहे, थांबायचे नाही असे बोलून पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दाखवला. तर, अमित शहांनी सोलापूरच्या सभेत बोलताना, पवारांनी काय केलं असे म्हटले होते. त्या वक्तव्याचाही समाचार पवार यांनी घेतला. तुरुंगात गेलेल्यांनी सांगू नये की, पवारांनी काय केलं, असे म्हणत अमित शहांवर टीका केली.