हरिदास रणदिवे
अरण : माढा लोकसभा निवडणुकीसाठी अरण (ता. माढा) येथील मतदान केंद्रावर आपल्या मातांबरोबर तीन मुली आल्या. त्यांच्या आर्इंनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली. दरम्यान, या तिन्ही मुलींनी आमच्याही बोटाला शाई लावा, असा हट्ट केला. त्यावेळी केंद्राध्यक्षांनी त्या मुलींना बोलावून घेत स्वत:च्या खिशातील पेनमधील शाई त्यांच्या बोटाला लावली अन् त्यांचा हट्ट पुरविण्याबरोबरच त्यांना लोकशाहीचे बाळकडूही दिले.
मंगळवारी दुपारी मतदानासाठी अरण येथील केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. यामध्येच शौर्या (इयत्ता पहिली, जिल्हा परिषद शाळा, अरण) तिची आई रूपाली दत्तात्रेय रणदिवे हिच्यासोबत तर अनन्या ( छोटा गट-नूमवि शिशू शाळा, सोलापूर) तिची आई सुप्रिया मनोज किरनाळे यांच्यासोबत आणि संजना (मोठा गट-आयडियल प्री स्कूल, नवी सांगवी, पुणे) तिची आई मानसी सुभाष रणदिवे यांच्यासोबत मतदान केंद्रावर गेल्या. तिघींच्याही आर्इंनी मतदान केलं. त्यांच्या बोटाला शाई लावलेलं या तिन्ही चिमुरड्यांनी पाहिलं़ त्यांनी याप्रसंगी त्यांच्या आर्इंनी मतदान केलेलेही पाहिलं.
मतदान कक्षातून बाहेर जाताना त्या तीन चिमुरड्यांनी हट्ट केला, आमच्यापण बोटाला शाई लावा म्हणून. उपस्थित सर्व पोलिंग एजंट, मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष आणि मतदार हे सगळं पहात होते. कुतूहलाने मतदान केंद्र अध्यक्ष (बाळासाहेब राजाराम पाटील, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल, पाचेगाव बुद्रुक, तालुका सांगोला) यांनी तिघींनाही स्वत:जवळ बोलावलं.
स्वत:च्या खिशातून पेन काढला आणि त्या पेनने चिमुकल्यांच्या बोटाला शाई लावून त्यांचा बालहट्ट पुरा केला. त्यानंतर त्या चिमुकल्यांसह उपस्थित सर्वांना खूप आनंद झाला.