सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युवा मतदारांना काय हवं आहे़ याचा शोध घेतलाय ‘लोकमत’च्या कट्ट्यावरील रिपोटींगने़ लोकमत ने साधलेल्या संवादात युवक व युवतींनी सुरक्षा, उच्च शिक्षण, शाश्वत नोकरी मिळावी असे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकांविषयी काय म्हणतात युवा मतदार जाणून घ्या.उद्योजक निर्माण होतील, असा अभ्यासक्रम हवाकोणाचीही सत्ता असो त्या सरकारने सर्वसामान्यांसह अहोरात्र कष्ट करणाºया त्या शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविणे गरजेचे आहे़ योजना राबवून त्या योजना प्रत्येकाला मिळाल्या का, याचाही अभ्यास केला पाहिजे़ सध्याच्या शिक्षणातून केवळ कारकून निर्माण होत आहेत. सरकारनं उद्योजक निर्माण होतील, अशा शिक्षणाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. युवकसुद्धा उद्योजक होऊ शकतात, ही जाणीव सरकारने युवकांमध्ये निर्माण करायला हवी. - निकिता पवार, वालचंद कॉलेज
रोजगाराअभावी युवकांच्या मानसिकतेत होतो बदलआधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण पद्धतीत वेगाने बदल होत आहेत़ ज्याप्रमाणे शिक्षणात बदल होत आहे त्याप्रमाणे स्पर्धाही वाढल्या आहेत़ या स्पर्धेमुळे भारतात बेरोजगारांची संख्या वाढली आहे़ आपल्या शिक्षण पद्धतीत बदल आवश्यक आहे. निवडणुका आल्या की राजकीय नेत्यांना युवकांच्या प्रश्नांचा, रोजगाराचा जास्त कळवळा येतो, मात्र सत्ता आल्यानंतर अथवा निवडून आल्यावर ते सर्व प्रश्न धुळीस मिळतात़ रोजगार उपलब्ध नसल्याने युवकांच्या मानसिकतेत बदल होतोय़ - ओंकार गिराम, उत्तर तालुका
महिला सुरक्षेसाठी वेगळे पाऊल उचलणे गरजेचेदेशातील भाजप सरकारने रोजगाराबाबत जे आश्वासन दिले ते पाळले नाही. ‘चौकीदार चोर है आणि मै भी चौकीदार’ या कॅम्पेनमुळे इतर मुद्दे निवडणुकीत मागे पडत आहेत. ‘स्टार्ट अप इंडिया’सारख्या योजना या केवळ कागदावर आहेत. आम्हाला १५ लाख नकोत तर १५ लाखांचं पॅकेज मिळणारं नोकरी हवी़ रोजगारक्षम शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षण मूलभूत गरज आहे. प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार यांचा समावेश असणे आवश्यक आहे. उद्योग वाढीसाठी प्रयत्न व्हावेत़ - निकिता संतोष राठोड, फताटेवाडी
युवकांमध्ये राजकीय साक्षरता काळाची गरजलोकसभा असो, विधानसभा असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की युवकांना नोकरीचे आमिष दाखवून मतांतर करून घेणाºया पक्षांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे़ युवकांना केवळ राजकीय स्वार्थासाठी जवळ केले जात आहे़ आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता तरुणांचा उपयोग हा राष्ट्रउभारणीसाठी नव्हे तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी करण्यात येत आहे. युवकांची क्रयशक्ती वेगळ्या मार्गाने जाताना दिसून येत आहे. राजकीय साक्षरतेची गरज आहे. रोजगारक्षम शिक्षण आवश्यक आहे़ - मयूर गिरे, संगमेश्वर महाविद्यालय
महिला सुरक्षा, आरोग्य, रोजगारावर भर हवामहिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊ, रोजगाराच्या निर्मितीत वाढ करू, बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागातील रिक्त जागा भरू, महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना अमलात आणू, अशा अनेक आश्वासनांनी भाजप सरकारने युवकांना पाच वर्षे आकर्षित करण्याचे काम केले़ बचत गटांच्या माध्यमातून काही प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम भाजपने केले, मात्र ते फार काळ टिकणार असं दिसत नाही़ युवतींना रोजगार, सुरक्षा, आरोग्य सेवासुविधा प्राधान्याने मिळायला हव्यात़ - अस्मिता पवार, सोलापूर.