सोलापूर : लोकसभा नकोरे बाबा, आपल्याला विधानसभाच बरी. कुणाला काय चर्चा करायची करू दे. आपली तयारी करमाळ्याची आहे, अशी प्रतिक्रिया झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली.
ड्रेसकोडवरून शिक्षक संघटना व झेडपी प्रशासनात सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी अध्यक्ष संजय शिंदे यांनी बैठक घेतली. समन्वय समितीच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करून ड्रेसकोडच्या वादावर पडदा पाडला. त्यानंतर त्यांच्या कक्षात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. माढा लोकसभा मतदार संघात भाजपतर्फे समविचारी नेत्यांबरोबर चाचपणी सुरू आहे. यात तुमचे नाव आहे काय, असे विचारले असता संजय शिंदे यांनी लोकसभेसाठी मी इच्छुक नाही, असे स्पष्ट केले.
विधानसभा लढवायची हे ठरवून करमाळा मतदार संघात काम सुरू केले आहे. या मतदार संघात १०३ ग्रामपंचायती आहेत. यातील जवळजवळ ४० ते ४५ ग्रामपंचायतींचे सरपंच माझ्या गोटातील आहेत. १५ टक्के लोकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपर्क केला आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविला आहे. त्यामुळे आपल्याला विधानसभाच बरी, असे ते म्हणाले. भाजपतर्फे सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी इच्छुकांची चाचपणी सुरू आहे. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची झेडपीत चर्चा आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी प्रयत्न करतील, असे बोलले जात आहे.
त्याचबरोबरीने समविचारी नेत्यांशी संपर्क साधून तिसरी आघाडी स्थापन करून या गोटातील उमेदवार दिला जाईल का, असे विचारले असता संजय शिंदे म्हणाले की, समविचारी म्हटल्यावर आमच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचाही समावेश होतो. त्यामुळे यातील कोणता नेता ठरविणार. मी लोकसभेसाठी नाही, हे आधीच सांगून ठेवले आहे. त्यामुळे लोकसभेसाठी तिसºया आघाडीबाबत अद्याप तरी निर्णय नाही.
अनेकांचे प्रस्ताव...मी विधानसभा लढविणार हे निश्चित आहे. पण कोणाच्या सोबत जायचे हे अद्याप फायनल नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर इतर पक्षांनीही प्रस्ताव दिला आहे, असे संजय शिंदे यांनी सांगितले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासमवेत जवळीक वाढविली आहे, त्यामुळे भाजपसोबत जाणार काय, असे विचारले असता तसे अजून काहीच ठरलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.