संतोष आचलारे
माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी संपत आहे. मतदानाच्या तयारीसंदर्भात प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. माढा मतदारसंघात तब्बल १९ लाख ४ हजार ८८५ मतदार आहेत. मतदान कशा पद्धतीने होणार, यासाठी नेमके काय करण्यात आले आहे याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची ही बोलकी उत्तरे !
प्रश्न : मशिन्स बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत काय उपाययोजना असेलउत्तर : माढा लोकसभा मतदारसंघाकरिता एकूण २ हजार २५ मतदान केंद्रे आहेत. यासाठी पुरेसे ईव्हीएम, बॅलेट व कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत. मशीन बंद पडली तर तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडे पर्यायी मशीन ठेवण्यात आल्या आहेत. अशा घटना घडल्या तर पंधरा मिनिटात पर्यायी व्यवस्था होणार आहे. त्यामुळे मतदानावर व्यत्यय येणार नाही.
प्रश्न : संवेदनशील मतदान केंद्र किती व त्यावर कसे नियोजन असेल?उत्तर : कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी ४३ केंद्रे संवेदनशील ठरवली आहेत. तर निवडणुकीच्या दृष्टीने २0 क्रिटिकल केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त देण्यात आला आहे. शिवाय मतदानाचे लाईव्ह चित्रीकरण होणार आहे.
प्रश्न : अतिरिक्त मतदान मशिन्सची काय व्यवस्था करण्यात आली आहे? उत्तर : माढा लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रात दोन बॅलेट युनिट तर प्रत्येकी एक कंट्रोल व व्हीव्हीपॅटची गरज असल्याने त्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय ४९२ कंट्रोल युनिट, ८२८ बॅलेट युनिट व ५११ व्हीव्हीपॅट मशिन्स राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी या मशिन्सची गरज असेल त्या ठिकाणी तातडीने पुरविण्यासाठी विशेष नियंत्रण रुम निर्माण करण्यात आले आहे.
दिव्यांग मतदारांसाठी ७३0 व्हिलचेअरदिव्यांग मतदारांचा मतदानात सहभाग वाढविण्यासाठी विशेष सुविधा देण्यात येत आहेत. त्यांना मतदानासाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दिव्यांगांसाठी १११0 व्हिलचेअरची गरज आहे. यापैकी ७३0 उपलब्ध झाले आहेत. उर्वरित खुर्च्याही सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उपलब्ध करून घेण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महिलांचे एक केंद्र तैनातया लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रात मतदान अधिकारी पासून ते शिपाई पर्यंत फक्त महिला असतील. मतदान घेण्यासाठी सहा महिला केंदे्र ही निश्चित करण्यात आली आहेत.