सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) नवीन कोविड ब्लॉक सुरू करण्यात येणार आहे. येथे काम करण्यासाठी ७० डॉक्टरांची गरज असून प्रत्यक्षात फक्त तीनच अर्ज आले आहेत. इतर पदांसाठी दुप्पट -तिप्पट अर्ज येत असताना डॉक्टर कोविड वॉर्डात काम करण्यास अनुत्सुक असल्याचे दिसत असून यामुळे हा नवा वॉर्ड सुरू करण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) नव्याने बी ब्लॉकमध्ये वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. या वॉर्डामध्ये सेवा देण्यासाठी ३१५ पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे. नव्याने सुरू होणाºया या १०० बेडच्या वॉर्डामध्ये २० बेड हे अतिदक्षता विभागासाठी असणार आहेत. याचा विचार करून तात्पुरत्या स्वरुपात ही पदे भरण्यात येत आहेत.
डॉक्टरांच्या ७० जागांसाठी तीन, स्टाफ नर्सच्या १२० जागांसाठी १९३, आयसीयू टेक्निशियनच्या दोन जागांसाठी-१, सुरक्षा रक्षकांच्या सहा जागांसाठी १०३, वर्ग चारच्या १०० जागांसाठी १८६, स्टोअर किपरच्या दोन जागांसाठी १०० फार्मासिस्टच्या एका जागेसाठी ५०, ईसीजी टेक्निशियनच्या ४ जागांसाठी ४७, लॅब टेक्निशियनच्या ६ जागांसाठी ४२ तर एक्स-रे टेक्निशियनच्या चार जागांसाठी २४ अर्ज आले आहेत. आयसीयू टेक्निशियन आणि डॉक्टर वगळता इतर पदांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
डॉक्टरांची अनास्था का ?मुळातच लोकसंख्येच्या तुलनेने डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यात कोरोनामुळे खासगी डॉक्टरांना ते काम करत असलेल्या ठिकाणी उपचार देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांनी अर्ज केला नाही. वैद्यकीय अधिकारी या पदावर काम करणाºया डॉक्टरांना ६० हजार रुपयांचे वेतन आहे. खासगी रुग्णालयात यापेक्षा जास्त वेतन मिळत असल्याने डॉक्टरांनी अर्ज सादर केले नाहीत. त्यामुळे आता सध्या सिव्हिलमध्ये काम करत असलेल्या डॉक्टरांवर याचा ताण पडण्याची शक्यता आहे. या भरतीमधील काही नियम शिथिल करून बीएएमएस डॉक्टरांचा विचार केला जाऊ शकतो.