सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी सेवेत असलेले डॉ. निरंजन तलकोकुल यांना झेडपीच्या सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा पषिरदेचे मुख्य कार्यकारी प्रकाश वायचळ यांनी गुरूवारी दिले आहेत.
‘जिल्हाधिकाºयांनी नोटीस दिलेला डॉक्टर जिल्हा परिषदेच्या सेवेत’ या मथळ्याखाली ठळकपणे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी वायचळ यांना मार्डीतील आरोग्य सेवेसाठी या डॉक्टराची सेवा आवश्यक आहे काय अशी विचारणा केली. त्यावर वायचळ यांनी जिल्हा परिषदेच्या कंत्राटी सेवेत घेताना घातलेल्या अटीचे उल्लंघन करून परस्पर खाजगी रुग्णालयात संबंधीत डॉक्टर सेवा देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा डॉक्टराला आम्ही सेवेत ठेवणार नाही असे स्पष्ट केले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या प्रमुखाला त्या डॉक्टराला कार्यमुक्त करण्याची फाईल सादर करावी असे आदेश दिले.त्यानुसार आरोग्य विभागाने तातडीने फाईल सादर केल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी डॉ. तलकोकुल यांना कार्यमुक्त करीत असल्याचा आदेश जारी केला.
जिल्हाधिकाºयांनी २९ मे रोजी मार्कंडेय रुग्णालयातील ३४ डॉक्टरांना कोरोणा रुग्णाच्या सेवेत हजर राहण्याची नोटीस दिली आहे. यामध्ये डॉ. निरंजन तलकोकुल यांचेही नाव आहे. पण ते मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत असल्याचे दिसून आले. त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत घेण्यात आलेले आहे. झेडपीने असे सेवेत घेतलेल्या डॉक्टरांना दुसरी खाजगी नोकरी करता येत नसताना आता पुन्हा हा तिसरा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे डॉ. तलकोकुल यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी दिले आहेत.