शीतलकुमार कांबळे
सोलापूर : लम्पी आजारामुळे अनेक जनावरे मृत्यूचा सामना करत असताना कंत्राटी पशुधन पर्यवेक्षकांनी शेतकऱ्याला मदत केली. या कंत्राटी डॉक्टरांना दोन महिन्यांपासून पगार दिला नाही. आता तिसरा महिना सुरू असताना कंपनी साधा फोनही उचलत नाही, अशी व्यथा डॉक्टरांनी व्यक्त केली.
गुजरात, राजस्थान येथे लम्पीने थैमान घातले होते. त्यानंतर काही दिवसांनी राज्यातही लम्पी आजाराचा शिरकाव झाला. सोलापूर जिल्ह्यातही अनेक जनावरे दगावली. त्यावेळी शासनाची यंत्रणा तोकडी पडली. म्हणून, एका खासगी कंपनीच्या माध्यमातून ५० कंत्राटी पशुधन पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली.
ऑगस्ट २०२२ मध्ये तीन महिन्यांसाठी डॉक्टरांसोबत करार करण्यात आला. तो संपल्यानंतर पुन्हा एप्रिल २०२३ मध्ये ५० डॉक्टरांसोबत करार झाला. हा करार झाल्यापासून डॉक्टरांना वेतन देण्यात आलेले नाही. सध्या डॉक्टर दवाखाना सांभाळत गावोगावी जाऊन जनावरांवर उपचार करत आहेत. फक्त ११ हजार रुपये देऊन सेवा घेतली जाते. त्यातील निम्मा खर्च हा पेट्रोलसाठीच जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शासनाने एका खासगी कंपनीकडून डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. कंपनीकडून वेतन मिळत नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केल्यास ते उचतत नाहीत. शासनाने डॉक्टरांची व्यथा जाणून वेतन द्यावे. पुढील वेतनात वाढ द्यावी. शासन डॉक्टरांची कायमस्वरूपी नेमणूक करणार आहे. यात कंत्राटी डॉक्टरांना प्राधान्य द्यावे. - डॉ. रणजित देशमुख, कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक, बंकलगी