पंढरपूर नगर परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत परवडणारी घरे या घटकांतर्गत २०९२ घरकुले बांधण्याची योजना सर्व्हे नं.१७/ब येथे सुरू आहे. या प्रकल्पामधील पहिल्या टप्प्यात ८९२ घरकुले बांधण्याचे काम चालू आहे. नगर परिषदेने ८ मार्च २०२१ रोजी ऑनलाईन लॉटरी पद्धतीने ८९२ लाभार्थ्यांची निवड केलेली आहे. या लाभार्थ्यांनी प्रकल्पामध्ये सदनिका मिळण्याकरिता स्वहिश्श्याची रक्कम ५.९५ लाख रुपये भरणे अपेक्षित आहे.
नगर परिषदेने ८९२ मंजूर लाभार्थ्यांना घरकुलासंदर्भात स्वहिस्सा भरण्याकरिता जुलै महिन्यात नोटिसा दिल्या होत्या. मात्र अद्यापर्यंत फक्त १४ इतक्या लाभार्थ्यांनी स्वहिश्श्याची रक्कम नगर परिषदेकडे भरलेली आहे. या योजनेचा लाभार्थ्यांनी स्वहिस्सा न भरल्यास हा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्याकरिता लाभार्थ्यांनी स्वहिश्श्याची रक्कम भरण्याकरिता सात दिवसाच्या मुदतीची अंतिम नोटीस देण्याचा निर्णय घेतला आहे. सात दिवसात लाभार्थ्यांनी स्वहिश्श्याची रक्कम न भरल्यास त्यांची मंजूर सदनिका पुढील लाभार्थ्याला देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
नगर परिषद प्रशासनातर्फे ज्या लाभार्थ्यांना सदनिका मंजूर झालेली आहे, त्यांनी पुढील सात दिवसात त्यांची स्वहिश्श्याची रक्कम नगर परिषदेकडे भरावी, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.
कोट ::::
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका मिळावी, यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज करावेत. नागरिकांनी अर्ज नगर परिषदेतील प्रधानमंत्री आवास योजना कक्षामध्ये सादर करावेत.
अरविंद माळी, मुख्याधिकारी, पंढरपूर नगर परिषद, पंढरपूर
फोटो : पंढरपूर येथे नगर परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यात आली आहेत. (छाया : सचिन कांबळे)