कुर्डूवाडी : निर्मन्युष्य माळरान... स्वच्छंदपणे चरत असलेला काळविटांचा कळप.. अचानक फिरस्ती कुत्र्यांनी हल्ला चढवला अन् जिवाच्या आकांताने भेदरलेला हा कळप सैरावैरा पळू लागला. आसरा शोधण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पातील २८ एकर परिसरात शिरला. काळवीट पुढे, कुत्री मागे अशा पाठशिवणीच्या खेळात अथक परिश्रमानं तिघे सुखरूप निसटले. दोघांना जायबंदी व्हावं लागलं. वॉचमन देवासारखा धाऊन आला आणि वन विभागाच्या मदतीनं चक्रव्यूहात अडकलेल्या मुक्या जिवांना जीवदान मिळालं. गुरुवारी सकाळी १० ते ११.३० असा दीड तास कुर्मदास मंदिजर परिसरातल्या माळरानावर हा थरार सुरू होता.
गुरुवारी साधारण सकाळी १० ची वेळ.. लऊळच्या कुर्मदास मंदिर परिसरात २८ एकर सौरऊर्जा प्रकल्प असलेल्या संबंधित माळरानावर पाच काळविटं चरत होती. अचानक पाठीमागून पाच- सहा कुत्री आली आणि त्यांच्यावर हल्ला करू लागली. भेदरलेली ती काळविटं जिवाच्या आकांतानं धावू लागली, तसे त्या पाच-सहा कुत्र्यांना मोठा चेव आला. तीही तेवढ्याचं वेगानं शिकार करायचीच या इराद्यानं काळविटांचा पाठलाग करू लागली. धावत धावत काळविटं जवळच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या तारेचं कुंपण असलेल्या गेटजवळ आली. वेगानं त्यांनी गेट ढकलून आतमध्ये प्रवेश केला.
पाठोपाठ कुत्रीही जोरजोरानं भूंकत पाठलाग करत होती. सबंध २८ एकर परिसरात हा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. पुढे हरणांचा कळप आणि पाठीमागे कुत्र्यांचा जत्था. धावता धावता ती कंपाउंडच्या चक्रव्यूहात अडकली. त्यांना पुन्हा बाहेर पडण्याचा रस्ताच दिसेना. धावता धावता अचानकपणे ती पुन्हा गेटकडे आली; पण दुर्देव तिथल्या तारेला अडकून बसली. तोपर्यंत तेथील वाचमन युवक कूर्मदास गवळी हा काय गोंधळ उडाला आहे म्हणून जवळच्या वस्तीवरून प्रकल्पाच्या गेटकडे धावत आला. पाहता क्षणी त्याने त्या कुत्र्यांना हुसकावून लावले.
या साऱ्या थरारात काळविटं भेदरलेली होती. कुत्र्यांना हुसकावून लावताच यातल्या तिघांनी तारेतून सुटका करून घेत निसर्गाच्या सान्निध्यात सुखरूप धूम ठोकली; पण यातल्या दोघा काळविटांना मात्र जायबंदी व्हावं लागलं. वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या पथकानं वेळीच धाव घेतल्याने जखमींवर आता मोहोळ येथे उपचार सुरू आहेत.
----
जखमी काळविटं उपचारासाठी मोहोळकडे रवाना
प्रसंगावधान राखत कूर्मदास गवळी यांना तारेच्या कुंपणात अडलेल्या दोन काळविटांंपैंकी एकाचा पाय मोडून पडल्याचे, तर एकाच्या पाठीला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकारी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे खबर दिली. लागलीच सर्व सूत्रे हलली आणि डॉ. विशाल अनंतकवळस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्राथमिक उपचार केले. तोपर्यंत वनविभागाच्या पथकाने त्या दोन काळविटांना पुढील उपचारासाठी मोहोळकडे नेण्यासाठी ताब्यात घेतले व रवाना झाले.
-----
वॉचमन आला देवदूत होऊन धावत
या मुक्या वन्यप्राण्यांना जीवदान देण्यासाठी वॉचमन कूर्मदास गवळी हा सर्वप्रथम धावून आला. त्याने कुत्र्यांना हुसकावून लावले म्हणूनच काळविटं सुखरूप वाचू शकली. त्यांना अभय मिळालं. त्यांच्याबरोबरच सतीश गवळी, नागेश नकाते, गोपाळ मोहिते, बिटू धुमाळ, नितीन धुमाळ, बापू धुमाळ यांनीही मोलाचे प्रयत्न केले.
................
फोटो ओळ-
१) लऊळ माळरानावर सौरऊर्जा प्रकल्पाच्या तारेच्या कंपाउंडमध्ये अडकलेल्या काळविटांंवर प्राथमिक उपचार करताना डॉ. विशाल अनंतकवळस व त्यांचे पथक.
२) कुत्र्यांंच्या हल्ल्यात तारेला अडकून एका काळविटास पाय गमावून बसावा लागला.