धक्कादायक बाब म्हणजे ३ लाख ५० हजार लोकसंख्या असलेल्या सांगोला तालुक्याचा डोलारा १०८ च्या दोन रुग्णवाहिकांवर अवलंबून आहे, तर ग्रामीण रुग्णालयाची १०२ रुग्णवाहिका फक्त शासकीय कामांसाठी वापरली जात असल्याचे बोलले जात आहे.
सांगोला तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. शहरासह अनेक गावे कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत. एप्रिलमध्ये तब्बल १००० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, आतापर्यंत ती रुग्णसंख्या ५ हजारांच्या जवळ पोहोचली आहे.
कोविड रुग्णांवर शहरातील ८ कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काही बेड व्हेंटिलेटरची सुविधा असलेले आहेत तर इतर सर्व बेड ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता असलेले रुग्ण दाखल करून घेण्यात येत आहेत. सध्या सांगोला तालुक्यासाठी १०८ क्रमांकाच्या फक्त दोनच रुग्णवाहिका असल्याने अनेकांना रुग्णवाहिकांसाठी वेटीग करावे लागत आहे.
खासगी रुग्णवाहिकेसाठी भरमसाट भाडे
कोरोना काळात त्रास होत असल्यास रुग्णांना पदरमोड करून खासगी रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे. खासगी रुग्णवाहिका भरमसाट भाडे आकारत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, आरोग्य यंत्रणा कोमात गेल्याने तालुक्यात कोरोनाबाधितांचा जीव धोक्यात आला आहे.