सोलापूर : रात्र गस्तीवरील महसूल पथकाने टाकलेल्या धाडीत घरगुती व व्यावसायिक गॅस टाक्यांचा साठा करून अवैधरीत्या वाहनांसाठी वापर करणारे रॅकेट सांगोला तालुक्यात यलमार मंगेवाडी रस्त्यावर उघडकीस आणला. यावेळी पथकाने २६ भरलेल्या व ३८ रिकाम्या गॅस टाक्या, गॅस भरण्यासाठी लागणा-या दोन मोटारी, दोन वजनकाटे, असा १ लाख २५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई यलमार-मंगेवाडी (ता. सांगोला) कच्चा रस्त्यावरील बंद दूध संकलन केंद्राजवळ केली. याबाबत मंडलाधिकारी महेश जाधव यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अमोल अशोक पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मंडल अधिकारी महेश जाधव, पोलके, तलाठी गायकवाड, लिगाडे हे २९ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० च्या सुमारास गस्तीवर होते. रात्री ११.३०च्या सुमारास कमलापूर, यलमर-मंगेवाडी हद्दीजवळ आल्यानंतर त्यांच्यासमोर अमोल पाटील यांच्या घराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून एक कार त्यांच्या पुढे सांगोल्याच्या दिशेने जात असताना त्यांना गॅसचा वास आला.
त्यांनी संशयीत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु ती न थांबता सांगोलाच्या दिशेने वेगात निघून गेली. त्यांनी परत त्याच कच्च्या रस्त्यावरून आतमध्ये गेले असता अमोल पाटील यांच्या बंद दूध संकलन केंद्र व गुरांच्या गोठ्यास चौफेर तारेचे कंपाउंडच्या आत पाहणी केली. यावेळी २६ गॅस टाक्यांसह ३८ रिकाम्या टाक्या, १४.५ किलोची रिकामी टाकी, असे सुमारे १ लाख २५ हजार ८०० रुपयांचे साहित्य मिळाले.