सोलापूर : नरसिंग गिरजी मिलच्या जागेवरील हेरिटेज इमारतींचे पाडकाम करुन मिलची जागा विक्री करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला असला तरी शिवसेनेच्या नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. महापालिकेने वस्त्रोद्योग महामंडळाला सात एकर जागेच्या बदल्यात वाढीव एफएसआय किंवा टीडीआर द्यावा. मिलची जागा वापरात यावी यासाठी विविध पर्यायांचा विचार व्हावा, असा सभासद प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा सहा आॅगस्ट रोजी होणार आहे. या सभेची पुरवणी विषयपत्रिका प्रसिध्द करण्यात आली आहे. एन.जी. मिलच्या सात एकर जागेवर पाच ते सात हेरिटेज इमारती आहेत. वस्त्रोद्योग महामंडळाने इमारतींच्या पाडकामाची निविदा काढली आहे. त्याला इंट्याकसह कृती समितीने विरोध केला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभासद प्रस्ताव दिला आहे. हेरिटेज वास्तूंमध्ये टेक्स्टाईल कॉर्पाेरेशनचे कार्यालय व्हावे, टेक्स्टाईल क्षेत्रात झालेली स्थित्यंतरे दर्शविणारे आधुनिक संग्रहालय व्हावे, प्रशिक्षण संस्था व्हावी, असे सूचविण्यात आले आहे. शिवाय या जागेची विक्री करण्याऐवजी कुर्डूवाडी येथे मंजूर असलेले रेल्वे वर्कशॉप किंवा मोठे व्यापारी संकुल व्हावे, असेही सूचविण्यात आले आहे. हेरिटेज वास्तू वाचविण्यासाठी वस्त्रोद्योग महामंडळाला अतिरिक्त एफएसआय आणि टीडीआर देण्याचा प्रस्ताव या सभेत मांडण्यात आला आहे. हेरिटेज वास्तूंचे पाडकाम करुन जागा विक्री करण्याचा निर्णय सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी याला विरोध केल्यामुळे भाजपचे नगरसेवक या प्रस्तावावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे.
उड्डाण पूल भूसंपादनाचा मार्ग मोकळा- शहरातील दोन उड्डाण पुलांसाठी बाधित होणाºया जागांची मनपा आणि भूसंपादन कार्यालयामार्फत संयुक्त मोजणी होणार आहे. मोजणीचे शुल्क महापालिकेने भरायचे आहे. यासाठी मनपा सभेची मंजुरी आवश्यक आहे. मनपा आयुक्तांनी जून महिन्यात याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता. परंतु, सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाºयांनी तो वेळेत सभेच्या अजेंड्यावर घेतला नाही. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर सभेच्या पुरवणी विषयपत्रिकेत हा विषय घेण्यात आला आहे.
राणी अवंतीबाई लोधी यांचा पुतळा उभारा- राणी अवंतीबाई लोधी यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणाची आहुती दिली. झाशीच्या राणीप्रमाणेच त्यांनीही १८५७ मध्ये मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्याची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी लोधी गल्ली बेडरपूल लगत राणी अवंतीबाई लोधी यांचा पुतळा उभारण्यात यावा, असा सभासद प्रस्ताव नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, रवी कैय्यावाले यांनी मांडला आहे.
सोशल एज्युकेशन संस्थेत दोन सदस्यांची नियुक्तीमहापालिकेने सोशल एज्युकेशन संस्थेला नाममात्र किमतीने जागा दिली आहे. जागेची खरेदी देताना या संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये महापालिकेचे दोन सदस्य असावेत, अशी अट घालण्यात आली होती. एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे पत्र या अटी व शर्तीप्रमाणे दोन सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्तावही सभेसमोर ठेवण्यात आला आहे.