सोलापूर : कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान सण साजरा होत आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून लोकांचे जसे सहकार्य मिळाले त्याप्रमाणे आता ईदच्या दिवशी लोकांनी घरात राहूनच पवित्र रमजान सण साजरा करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.
दिनांक २२ मार्च रोजी केंद्राच्या वतीने जनता कर्फ्यू जाहीर केला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिनांक २१ मार्चपासून राज्यशासनाने महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली. त्यानंतर वेळोवेळी परिस्थिती पाहून संचारबंदी वाढविण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात कोणताही सण व उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यात आला नाही. लोकांनी नियमांचे पालन करून शासनाला व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे.
गेल्या २० ते २५ दिवसांपासून पवित्र रमजान ईदला सुरूवात झाली आहे. नागरिकांना करण्यात आलेल्या आवाहनानुसार शहरातील मशिदींमधून नमाज पठण झाले नाही. लोकांनी आपल्या घरातच नमाज पठण करून एकत्र येण्याचे व गर्दी करण्याचे टाळले आहे. दिनांक २५ मे रोजी रमजान सण साजरा होणार आहे. या दिवशीही लोकांनी ज्या पद्धतीने घरात नमाज पठण केले आहे, त्या पद्धतीने घरातच रमजान ईद साजरी करावी. घराबाहेर पडू नये व व्हॉट्सअॅप, मेसेजच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात, असे पोलीस आयुक्त शिंदे यांनी सांगितले.
सात पोलीस ठाण्यांत मोठा बंदोबस्त...- शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगरवस्ती पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लोकांनी गर्दी करू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचे दोन पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, फौजदार आणि पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत़ या साखळीला तोडण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. मुस्लिम बांधवांनी रमजान ईद घरातच साजरी करावी. रमजान ईदच्या सर्व सोलापूरकरांना शुभेच्छा.- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त.
काझीसह धर्मगुरूंना दिल्या आहेत सूचनारमजान ईदनिमित्त मुल्ला मौलवी, शहर काझी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वांनी सहमती दिली असून, ईद घरातच साजरी करण्याचे आवाहन मुस्लिम बांधवांना केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त शिंदे यांनी दिली.