तीन-चार वर्षांत जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्यापटीत विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढत आहे. खरीप पिकांसाठी
मागील वर्षी जिल्ह्यातील २ लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी १ लाख ८९ हजार ८१५ हेक्टरवरील विविध पिकांपोटी १० कोटी ३४ लाख ६४ हजार रुपये भरले होते. मात्र त्या पटीत शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई मिळाली नाही. कृषी खात्याचे नियम व तांत्रिक अडचणी असतील मात्र मागील दोन-तीन वर्षांत पीकविम्याची नुकसानभरपाई मिळत नसल्याची शेतकऱ्यांरी तक्रारी आहे.
राज्यभरातच नुकसानभरपाई मिळत नसल्याने विमा कंपन्यांसमोर शेतकरी व संघटना आंदोलन करीत आहेत. त्यामुळे विमा कंपन्याच वादात सापडल्या आहेत. प्रशासनासाठी अडचणीची ठरलेली पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी तर डोकेदुखी ठरत आहे. यामुळेही पीकविमा योजनेसाठी शेतकऱ्यांचा सहभाग कमी झाल्याचे दिसत आहे. यावर्षी बुधवारी सकाळपर्यंत खरीप पिकांसाठी एक लाख १५ हजार ४६७ शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. ८८ हजार २४९ हेक्टरसाठी विम्याची रक्कम भरली आहे. पीकविमा भरण्याची गुरुवारी १५ जुलै ही शेवटची तारीख आहे. मात्र कृषी खात्याला उद्यापर्यंत भरपूर शेतकरी विम्याची रक्कम भरतील, अशी आशा आहे.
------
बार्शी, अक्कलकोट, मंगळवेढा
खरीप पिकांसाठी बार्शी तालुक्यातून उच्चांकी ६८ हजार ५२४, अक्कलकोट तालुक्यातील १६ हजार ८१६, तर मंगळवेढा तालुक्यातील १५ हजार ३६ शेतकऱ्यांनी पीकविम्यापोटी रक्कम भरली आहे. इतर तालुक्यातील संख्या मात्र फारच कमी आहे. ही आकडेवारी मंगळवारी सकाळपर्यंतची आहे.
----
यावर्षी पेरणीही दोन लाख ३५ हजार हेक्टरवर झाली आहे.
आपल्याकडे शेवटच्या दिवशीच विम्यापोटी रक्कम भरण्यासाठी शेतकरी गर्दी करतात. त्यामुळे उद्या रात्रीपर्यंत विमाधारक शेतकऱ्यांची संख्या वाढेल. यावर्षी अधिकाधिक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल.
- रवींद्र माने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
----