सावरकरांचा मुद्दा आता काढू नका, आमचं सरकार व्यवस्थित चाललंय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 05:51 AM2020-01-20T05:51:06+5:302020-01-20T05:51:34+5:30
संजय राऊत अंदमानला गेले की नाही माहीत नाही, पण मी जाऊन आलोय. सावरकरांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात आल्या आहेत.
सोलापूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी त्याग केलाय ही वस्तुस्थिती आहे. पण सावरकरांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात आल्या आहेत. आता त्या गोष्टी काढू नका. आमचं सरकार चाललंय चालू द्या. हा मुद्दा आता येत नाही, असे मत काँग्रेसचे प्रवक्ते खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत खा. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता दलवाई म्हणाले, संजय राऊत अंदमानला गेले की नाही माहीत नाही, पण मी जाऊन आलोय. सावरकरांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात आल्या आहेत. अनेक वर्षे ते एकाच बरॅकमध्ये होते वगैरे हे खरे नाही. तीन महिन्यांतून एकदा सर्वांना इकडून तिकडे हलवले जायचे. इतर लोकांनाही तिथे शिक्षा झाली होती. पण आता या गोष्टी काढू नका. आमचं सरकार चाललंय, चालू द्या.
हे सरकार भागवत चालवतात का?
राष्ट्रीय नागरिकत्व कायदा मागे घेणार नाही असे मोहन भागवत म्हणतात. भागवत हे काय देशाचे पंतप्रधान आहेत काय?, असा सवालही दलवाई यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सरकार कोण चालवतंय, याचं उत्तर द्यावं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्यावेळी इंदिराजींनी लोकांच्या भावना पंडित नेहरु यांच्यापर्यंत पोहोचविल्या. सरकारने प्रतिष्ठेचा मुद्दा न करता निर्णय मागे घेतला. तामिळनाडूमध्ये हिंदीला विरोध झाल्यानंतर हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे तर संपर्क भाषा झाली, असे त्यांनी सांगितले.