सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना दाबले जात आहे. आघाडीचा धर्म पाळला जात नाही. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत हे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर लढवून आपली ताकद दाखवू, अशी भूमिका मोहोळ, मंगळवेढा, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी काँग्रेस भवनात मांडली.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर तालुक्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी मोहोळ, मंगळवेढा, सांगोला व पंढरपूर तालुक्याचा त्यांनी आढावा घेतला. मोहोळ तालुक्याच्या बैठकीत माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, जिल्हा महिलाध्यक्ष शाहीन शेख, देवानंद गुंड, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष गौरव खरात, राजेश पवार, हनुमंत पाटील, सुरेश शिवपुजे, शहराध्यक्ष पोपट कुंभार, रफिक पाटील, सुलेमान तांबोळी, भीमराव वसेकर, अरुण पाटील,किशोर पवार,बिरा खरात सुरेश हावळे यांनी हजेरी लावून तालुक्यातील स्थिती मांडली. तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस कार्यकर्त्यांना दाबत आहेत. मोहोळमध्ये काँग्रेसचे कार्यालय नाही. प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत करायची पण आपला वाटा कुठायं असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीत गटबाजी सुरू आहे. त्याची किमत ते मोजतील पण नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपली ताकद दाखवावीच लागेल, अशी मागणी केली.
मंगळवेढा तालुक्याच्या बैठकीत तालुकाध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, नितीन नागणे, विठ्ठल आसबे, संदीप फडतरे यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा द्यावा, अशी मागणी केली. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत नेतृत्वाचे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनाला आणले. सांगोला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान होत असून, ताकद दाखावीच लागेल असे सांगितले. पंढरपूरच्या सुनेत्रा पवार, राजेश बादाेले यांनीही राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करता स्वतंत्रपणे लढू, अशी मागणी केली.
नव्याने ताकद उभी करणार
काँग्रेसची नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठीच या बैठका होत असल्याचे उपाध्यक्ष ॲड. रामहरी रुपनर, प्रवक्ते डॉ. बसवराज बगले यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आपली ताकद उभी करण्याबाबत निश्चित पावले उचलली जातील, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी यावेळी दिले.