सोलापूर : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावेत, असे जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
राज्यात मागील आठवड्यापासून दररोज कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शासनाने अलर्ट जारी केला असून, उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेत सीईओ दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग व पंचायत विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते उपस्थित होते.
कोरोनासंबंधी जिल्ह्यात पुन्हा एकदा अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये कोरोना आजाराबाबतीत जनजागृती करणे, मास्क वापरण्याचा आग्रह करणे, हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, तसेच फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करण्याबाबत सांगण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणांना कोरोनाचे टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुन्हा एकदा जिल्ह्यातील नागरिकांनी सावध राहावे. सध्या घाबरण्याचे कारण नाही; पण रुग्णसंख्या वाढत जाऊ नये, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. नागरिकांना सहकार्य करावे, असे सीईओ स्वामी यांनी केले आहे.