सोलापूर : सोलापूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणांना गर्दी करू नका असं सांगणं एका नर्सच्या अंगलट आलं. लोकांना गर्दी करू नका असं सांगणाºया नर्स आणि तिच्या पतीची जमावाने थेट गाडी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. सोलापुरातील विडी घरकूल इथे हा प्रकार घडला आहे.
कोरोना मुळे एकत्र खेळू नका असे सांगणाºया मार्कडेय रुग्णालयातील स्टाफ नर्स आणि त्यांच्या पतीच्या गाड्या जाळल्या. सुरेखा पुजारी असे नर्सचे नाव असून त्यांची गाडी क्रमांक एमएच १३ बीजे ६१५५ आणि त्यांच्या पतीची गाडी क्रमांक एमएच १३ सी ४२१३ या दोन्ही गाड्या त्या समाजकंटकांनी काल रात्री जाळल्या. सदरची महिला ही कुंभारी येथील विडी घरकुल मध्ये ८१७/४ या ठिकाणी राहत असून पोलिसांनी कुंभारी पोलिस चौकीमध्ये तिने तक्रार केल्यानंतर देखील दुपारी दुर्लक्ष करण्यात आले. कोणीही पोलीस आले नाहीत त्यामुळे रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदर महिलेच्या घरासमोर मोकळ मैदान असून याठिकाणी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दहा ते बारा मुले खेळत होती़ आपल्याकडे बारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, आता तरी खेळू नका असे त्या महिलेने गुरूवारी दुपारी सांगितले मात्र तू दररोज मार्कडेय हॉस्पिटलला जाते, तुझ्यामुळे कोरोना येत नाही का असं सांगत तुला बघून घेतो अशी दमदाटी ही करण्यात आली आणि रात्री हे कृत्य केले़ याबाबत सदर महिलेने कुंभारी पोलीस चौकी मध्ये तक्रार दिली असून तिला वळसंग येथे जाऊन तक्रार देण्याचे सांगितले असल्याचे सांगण्यात आले.