सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यासाठी आलेल्या दूरदर्शनच्या टीममधील एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे संपूर्ण पथकाला व्कारंटाइन करण्यात आले आहे. नव्याने दाखल होणाºया पथकाचे स्वॅब घेतले जाणार आहेत. त्यामुळे लाइव्ह प्रक्षेपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी मध्यरात्री होत आहे. या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनची सहाजणांची टीम सोमवारी पंढरपुरात दाखल झाली होती. या सर्वांची राहण्याची एकत्रित व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासनाने सोमवारी त्यांची स्वॅब टेस्ट घेतली.
मंगळवारी सकाळी यातील एकाचा स्वॅब टेस्ट पॉझीटिव्ह आली. त्यामुळे उर्वरित पाच जणांना भक्तनिवासात व्कारंटाइन करण्यात आले. पुणे, मुंबईतून नवी टीम येत आहे. ही टीम सायंकाळी चारपर्यंत पंढरपुरात दाखल होणार आहे. पंढरपुरात आल्यानंतर या सर्वाचे स्वॅब घेण्यात येतील. स्वॅब रिपोर्ट आल्यानंतरच त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. शासकीय महापूजेचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाºयाजवळ कॅमेरे लावले जातात. यासाठी दोन तीन तासांचा कालावधी लागतो. यापार्श्वभूमीवर लाइव्ह प्रक्षेपणाची तयारी होईल की नाही यावरुन जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही बुचकाळ्यात पडली आहे.