सोलापूर: तेराशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरून सोलापूर विद्यापीठाने ‘डबल आर’चा शेरा हटविला असून, थेट निकाल घोषित करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. यात बहुतांश विद्यार्थी पास झाले असून विद्यार्थी टेन्शन फ्री झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या चुकीमुळे तेराशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'डबल आर' चा शेरा बसला होता. गुणपत्रिकेवर पास किंवा नापासचा शेरा न येता रिझल्ट रिझर्व्ह असा शेरा विद्यापीठाने दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याबाबत विद्यापीठाकडे तक्रार केल्यानंतर विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांकडे बोट दाखवले. त्यामुळे विद्यार्थी आणखीन टेन्शनमध्ये आले. याविषयी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. गुणपत्रिकांमध्ये दुरुस्ती करून विद्यापीठाने शुक्रवारी पुन्हा निकाल जाहीर केले.