सतीश बागल
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील राजकारण आणि अर्थकारण हे साखर कारखानदारीभोवती फिरत असते. यंदाच्या निवडणुकीत ११ मतदारसंघांत १२ कारखानदार मैदानात आहेत. प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार देण्यात आल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.
करमाळा मतदारसंघात शिवसेनेकडून रश्मी बागल निवडणूक मैदानात आहेत. मकाई व आदिनाथ साखर कारखाना त्यांच्या गटाकडे आहे. त्याठिकाणी झेडपी अध्यक्ष संजयमामा शिंदे अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात आहेत. विठ्ठल कॉर्पोरेशन या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी याठिकाणी बंडखोरी केली आहे. गतवेळेप्रमाणे यंदाही या मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. माढा मतदारसंघातील राष्टÑवादीचे उमेदवार बबनराव शिंदे हे तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून संजय कोकाटे हे निवडणूक मैदानात आहेत.
माळशिरस तालुक्यातील राष्टÑवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर हे चांदापुरी येथील शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून राम सातपुते निवडणूक लढवित आहेत. सोलापूर दक्षिण मतदारसंघातून भाजप उमेदवार सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख हे बीबीदारफळ, भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्याचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री निवडणूक लढवित आहेत.
अक्कलकोट मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार सिध्दाराम म्हेत्रे निवडणूक मैदानात आहेत. मातोश्री साखर कारखान्याचे ते मार्गदर्शक आहेत. त्यांच्याविरोधात भाजप तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी निवडणूक लढवित आहेत. बार्शी मतदारसंघात शिवसेनेकडून अॅड. दिलीप सोपल, अपक्ष राजेंद्र राऊत व राष्टÑवादीचे निरंजन भूमकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. आर्यन साखर कारखाना हा अॅड. सोपल यांच्या संबंधातील आहे.
पंढरपुरात सर्वाधिक रिंगणात- निवडणूक लढवित असताना सहकारी असो वा खासगी साखर कारखाना याचा आधार महत्त्वाचा ठरत असतो. सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने पंढरपूर मतदारसंघात सर्वाधिक तीन साखर कारखानदार आमने-सामने आहेत. त्यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भारत भालके हे राष्टÑवादी काँग्रेसकडून, पांडुरंग कारखान्याचे चेअरमन सुधाकर परिचारक महायुतीकडून तर दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे हे अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात आहेत. गत निवडणुकीत आवताडे हे शिवसेनेकडून निवडणूक मैदानात होते.