कोळा (ता. सांगोला) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असल्याने त्या ठिकाणी त्यांचे स्मारक आणि अस्थी विहार व्हावे यासंदर्भातील विषय सोलापूर जिल्हा परिषद सभागृहात सातत्याने चर्चेला येत होता. हा विषय झेडपी सदस्य ॲड. सचिन देशमुख यांच्यासह जिल्हा व सांगोला तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी लावून धरला होता. यासाठी मागील वर्षी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हा निधी अपुरा असल्याने या कामासाठी जास्त निधीची मागणी केली होती. विद्यमान झेडपी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अर्थ व बांधकाम सभापती विजयराव डोंगरे, समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे, पशू संवर्धन सभापती अनिल मोटे, महिला बालकल्याण सभापती स्वाती शतगार यांनी उर्वरित ६० लाखांच्या निधीची मंजुरी दिल्याने स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोट ::::::::::::::
कोळे येथे सुमारे १ कोटी १३ लाख ५६ हजार रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे नागपूर दीक्षाभूमी व मुंबई येथील चैत्यभूमी इतकेच महत्त्व या स्मारकासह अस्थी विहाराला असणार आहे. या वास्तूत वाचनालयासह अभ्यासिकेचा समावेश आहे. भविष्यात हे स्मारक अद्ययावत आणि सुसज्ज व्हावे, यासाठी ४ कोटी निधीची आवश्यकता असल्याने त्याचा प्रस्ताव जि.प.च्या वतीने तयार केला आहे. आ. संजय शिंदे यांच्या मार्फत राज्य सरकारकडून निधी मंजूर करून घेतला जाईल.
- ॲड. सचिन देशमुख
झेडपी सदस्य, कोळा