सोलापूर : अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखा व समविचारी सभा सोलापूर यांनी रविवारी सकाळी निर्भय मॉर्निंग वॉक काढत नरेंद्र दाभोळकर अमर रहे चा जयघोष घुमला. पुणे येथे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा डोक्यात गोळ्या घालून निर्घुणपणे खून होऊन दहा वर्षे उलटून गेली तरीही त्यांच्या मारेकऱ्यांना अजूनही शिक्षा झाली नाही. खरा सूत्रधार सापडला नाही, याचा निषेध करण्यात आला.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करून तसेच डॉ नरेंद्र दाभोळकर यांना मौन पाळून आदरांजली वाहून निर्भय मॉर्निंग वॉकला सुरवात करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेचे कार्यकर्ते तसेच समविचारी सभा यांचे कार्यकर्ते यांनी "आम्ही सारे दाभोळकर, हल्लेखोरांनो हाय हाय, विवेकाचा आवाज संपणार नाय, डॉ. दाभोळकर अमर रहे, कोण म्हणतो मरून जाईल, दाभोळकर विचार कायम राहील इ अनेक घोषणा दिल्या.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या बारा पुस्तकांचा लोकार्पण सोहळा सुद्धा प्रा. डॉ. अर्जुन व्हटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेचे अध्यक्ष प्रा. शंकर खलसोडे, कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर, सचिव ब्रह्मानंद धडके, उषा शहा, सरीता मोकाशी, लता ढेरे, यशवंत फडतरे, व्ही. डी. गायकवाड, निनाद शहा, आर. डी. गायकवाड, सनी दोशी, धनाजी राउत, शकुंतला सुर्यवंशी, अभिंजली जाधव, निलेश गुरव, आसिफ नदाफ, सरफराज शेख ,दत्ता चव्हाण, किशोर झेंडेकर, राम गायकवाड, राहुल जाधव, प्रसाद चव्हाण, अशोक खानापुरे, शिवलिंग शहाबादे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ "आम्ही प्रकाशबीजे, रूजवित चाललो" हे गीत गावून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.