आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनिषा मुसळे-माने हिला आज सोलापूर जिल्हा न्यायालयाने पुन्हा दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासातील वेग अन् घटनेची गंभीरता पाहता आणखीन दोन दिवस पोलिस कोठडी मिळाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी कोठडीत असलेल्या आरोपी मनीषा माने-मुसळे हिच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. तिला बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी आणखीन तपास करण्यासाठी पोलिस कोठडी मागितली. यावेळी आरोपीच्या वकिलांनीही युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर मनिषा माने-मुसळे हिला दोन दिवसाची पुन्हा पोलिस कोठडी मुख्य न्यायाधीश विजयसिंह भंडारी यांनी सुनावली आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात आणखीन वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. हॉस्पीटलमधील कर्मचारी यांनी माने-मुसळे हिच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत. याशिवाय फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर, शोनाली वळसंगकर व अन्य लाेकांचा पोलिस जबाब घेत तपास करीत आहेत. सोलापूर शहर पोलिस तपास वेगाने करीत असून लवकरच डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येसंदर्भातील अंतिम सत्यता बाहेर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.