सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुस्तक वाटप करण्याचे काम श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने केले जात आहे. महापुरुषांची माहिती व्हावी व त्यांना प्रेरणा मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविला जात आहे.
शालेय जीवनात शिकणाºया विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबविला जात आहे. २0१६ साली श्रीमंतयोगी प्रतिष्ठानची स्थापना झाली. २०१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भवानी पेठेतील वंचितांची शाळा येथे हा उपक्रम राबविण्यात आला. २०१८ साली महानगरपालिकेच्या जयभवानी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, बाबासाहेबांची भाषणे, त्यांचा परिचय आदी विविध पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत भेट दिली जातात. यंदाच्या वर्षी भडंगे गल्ली येथील आदर्श हायस्कूल येथे हा उपक्रम राबविला जात असून, प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जात आहेत.
आजवर दोन हजार विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट देण्यात आली आहेत. १४ एप्रिल रोजी शाळेला सुट्टी असते त्यामुळे १३ एप्रिल रोजी कार्यक्रम घेतला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा अभ्यास केल्यास भविष्यात मुले काय होऊ शकतात हे पटवून सांगितले जाते. यंदाच्या उन्हाळा सुट्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे वाचन करून त्यांचे विचार आत्मसात करा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले जाते. या उपक्रमाला शाळांमधून प्रतिसाद वाढत आहे. विद्यार्थी दशेतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्याचे काम संस्था करीत आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छोट्या छोट्या पुस्तकांची खरेदी करून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम संस्थापक महेश कासट करीत आहेत.
तर खºया अर्थाने जयंती साजरी होईल : महेश कासट- वंचित घटकात जन्मलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत शिक्षण घेतले. संपूर्ण आयुष्य अभ्यास करून त्यांनी देशात मोठी क्रांती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात भारतीय संविधान तयार करून देशात आदर्श लोकशाही प्रस्थापित केली. वंचित घटकातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य पणाला लावले. त्यांच्या कार्याचा आदर्श आणि विचारांची प्रेरणा घेऊन भावी पिढी घडावी हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना पुस्तके देत आहोत. दरवर्षीच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजले तरी संस्थेचा हेतू साध्य होईल. विद्यार्थ्यांनी कशासाठी व कसे शिकलं पाहिजे याच आकलन बालवयातच व्हावे म्हणून पुस्तके भेट दिली जातात. पुस्तकांचे वाटप करून खºया अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करतो. इतर सामाजिक संघटनांनी असे उपक्रम राबवावेत असे आवाहन श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी केले आहे.