साेलापूर : महापालिका आणि रिमाेट सेन्सिंग कंपनीने नव्या शहर विकास याेजनेसाठी सलगरवस्ती, साेरेगाव आणि देगाव, डाेणगाव येथील काही भागाचा ड्राेन सर्व्हे पूर्ण केला. ड्राेन सर्व्हेद्वारे तयार केलेले नकाशे ‘सिटी सर्व्हे’कडून प्रमाणित करून घेण्यात येत आहेत. या नकाशांमुळे रस्ते, आरक्षित जागांवरील अतिक्रमण राेखणे, विकासकामांच्या नियाेजनासाठी मदत हाेणार आहे.
महापालिकेच्या दुसऱ्या शहर विकास आराखड्याची (डीपी प्लॅन) मुदत २०२४ मध्ये संपत आहे. तत्पूर्वी तिसऱ्या विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ १७८.५७ चाैरस किलाेमीटर आहे. या क्षेत्राचे नकाशे, ड्राेनद्वारे माेजणी, सर्वेक्षणाची जबाबदारी हैदराबादच्या रिमाेट सेन्सिंग कंपनीवर आहे. १५ दिवसांपूर्वी ड्राेन सर्व्हेला सुरुवात झाली. ३०० ते ३५० फूट उंचीवरून साेरेगाव, सैफूल, सलगर वस्ती, डाेणगाव राेड, देगाव राेड या भागातील छायाचित्रण, माेजणी करून घेतली. याद्वारे प्रत्येक भागाचा नकाशा तयार केला. एकूण क्षेत्रफळापैकी ३० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा नगर रचना कार्यालयातील आवेक्षक महेश क्षीरसागर यांनी केला.
--
शहराचे एकूण ५०९ भाग
नगर रचना कार्यालयाने ड्राेन सर्व्हेसाठी ६०० मीटर ६०० मीटरचे एकूण ५०९ भाग केले आहेत. या प्रत्येक भागाचा एक नकाशा तयार हाेताेय. या नकाशामध्ये त्या भागातील झाडे, रस्ते, इमारती, पाण्याची पाइप लाइन, ड्रेनेज लाइन, आरक्षित जागा, रुग्णालये, टाॅवर, शाळा, वीज पुरवठ्याची लाइन, उद्याने, तलाव व इतर महत्त्वाच्या स्थळांच्या नाेंदी केल्या जात आहेत. हा नकाशा प्रमाणित झाल्यानंतर प्रत्येक प्लाॅटची हद्द निश्चित असेल. नागरिकांना पुन्हा माेजणी करून घेण्याची आवश्यकता भासणार नाही, असा महापालिका आयुक्तांचा दावा आहे.
--
अपुरे मनुष्यबळ
महापालिकेला या कामासाठी नगरविकास खात्याकडून अद्यापही तांत्रिक सल्लागारांचे डीपी युनिट मिळालेले नाही. पालिकेने या कामासाठी अधिकाऱ्यांचा विशेष पथक केलेले नाही. नगररचना कार्यालयातील महेश क्षीरसागर हे एकच अधिकारी या कामावर नियंत्रण ठेवून आहेत. त्यांच्या मदतीला कर्मचारी नाहीत. त्यामुळे या कामाचा वेग वाढत नसल्याचे इतर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
--