सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील धाब्यांवर टाकलेल्या धाडीत चार धाबे चालकांसह ११ मद्यपी ग्राहकांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने हॉटेल चालकाला प्रत्येकी २५ हजार रुपये व ग्राहकांना प्रत्येकी ३ हजार असे १ लाख
२९ हजारांचा दंड ठोठावला आहे. राज्य उत्पादन विभागाकडून गुरुवारी हैदराबाद रोडवरील एका हॉटेलाल धाड टाकत हॉटेल चालक सुनील शंकर कांबळे ( वय ३०) व त्या ठिकाणी दारू पीत बसलेले मद्यपी ग्राहक दत्ता सुधाकर लोंढे ( वय ३०), सागर सुभाष सरवदे व वसीम मेहबूब नदाफ या तीन ग्राहकांना जागेवरच अटक केली. दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने सोलापूर होटगी रोडवरील मजरेवाडी येथील हॉटेल विकास या ठिकाणी धाड टाकून हॉटेल चालक सिद्धराम बालाजी मोरे ( वय २९) व ग्राहक विजय हुचन्ना बनसोडे (वय ३२), स्वप्निल दगडू काळे ( वय २८) व शिवराज धनप्पा कस्तुरे ( वय २४) यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विभागाचे दुय्यम निरीक्षक अक्षय भरते यांच्या पथकाने बसवनगर ते मंद्रूप रोड वरील हॉटेलवर धाड टाकून हॉटेल मालक मोतीलाल चीमलाल राठोड व तीन मद्यपी ग्राहक अमोगसिद्ध माळसिद्ध मोगलाई, आकाश गुरुबाला उमराणी, शिवराज श्रीमंत कोळी या ग्राहकांना अटक केली.
तिनही गुन्ह्यातील तपास अधिकारी-यांनी एका दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात शुक्रवारी सादर केले असता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी दारूबंदी न्यायालय नम्रता बिरादार यांनी हॉटेल चालक मालकांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.