सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या करमाळा पथकाने गुरुवारी पिंपळनेर (ता. माढा) येथील होटेल आर्या येथे टाकलेल्या छाप्यात न्यायालयाने धाबा मालक व २ मद्यपींना एकूण २६ हजारांचा दंड ठोठावला आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन विभागाच्या करमाळा विभागाचे दुय्यम निरिक्षक विनायक जगताप यांच्या पथकाने गुरुवारी दुपारच्या सुमारास माढा तालुक्यातील पिंपळनेर गावाच्या हद्दीतील होटेल आर्या येथे छापा टाकला असता हॉटेलल चालक दत्ता संदिपान पैठने (वय ३७) हा ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असल्याचे आढळून आला. तसेच त्या ठिकाणी दारू पीत बसलेले मद्यपी ग्राहक सिद्धेश्वर जयसिंग चट्टे (वय ३५) व नागनाथ पोपट मोरे (वय ४५) या दोन ग्राहकांना जागेवरच अटक करण्यात आली.
गुन्ह्यातील तपास अधिकारी यांनी एका दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र शुक्रवारी न्यायालयात सादर केले असता सह न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, माढा वाय. एस. आखरे यांनी हॉटेल चालकाला २५ हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, प्रभारी उप-अधीक्षक सूरज कुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विनायक जगताप व जवान विकास वडमिले यांच्या पथकाने पार पडली.