सोलापूर: औषध वितरकाने वाहनामध्ये बॅगेत ठेवलेली अडीच लाखांची रोकड त्यांच्या चालकानेच पळवून नेल्याची तक्रार नोंदवल्याने चालकाविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. ही घटना सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ या वेळेत शासकीय रुग्णालयाच्या आवारात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तुषार राजाराम गोंधळी (वय- २५, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर, सध्या कोल्हापूर) असे गुन्हा नोंदलेल्या चालकाचे नाव आहे.
फिर्यादीत श्रीकांत हरिभाऊ पाटील (वय ३९, रा. कांदे, तालुका शिराळा) यांनी म्हटले आहे की, यातील फिर्यादीचे मालक सुरेश पाटील यांची औषध वितरणाची कंपनी आहे. सांगली जिल्ह्यातील कांदे येथून त्यांचा हा व्यवहार सुरू असतो. औषध वितरणासाठी ते सांगली जिल्ह्यासह शेजारील अन्य जिल्ह्यांत जातात. यासाठी त्यांच्याकडे स्वतःचे वाहन आहे. या वाहनावर यातील आरोपी तुषार गोंधळी हा चालक म्हणून काम करतो.
३० जानेवारी रोजी यातील फिर्यादी हे औषधांचे वितरण करण्यासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात आले होते. तेथे वाहन थांबवून ते औषध वितरणाचे काम करीत होते. त्यादरम्यान त्या वाहनात एका बॅगेत २ लाख ४५ हजारांची रोकड ठेवलेली होती. यातील आरोपी चालकाने ती रक्कम घेऊन पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी फौजदार माळी तपास करीत आहेत.