वैराग : गौडगाव नागोबा चौक ( ता. बार्शी ) येथे दोन्ही गाड्या रस्ता क्रॉस करताना बस व कारचा अपघात होऊन दोन्ही वाहनातील वाहनचालक व प्रवासी जखमी झाले. शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला. यात धर्मेंद्र त्रिंबक शिंदे (वैराग) हा शिक्षक जखमी झाला. बसच्या भरधाव वेगामुळे कार १५ फूट फरफटत गेली.
जखमी फिर्यादी शिक्षक शिंदे (रा. वैराग ता.बार्शी) यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली असून, बस चालक सचिन नामदेव जगदाळे (रा. बार्शी) याच्या विरोधात गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सूत्रांनुसार शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता निघणारी एस.टी बार्शी वरून वाहनचालक सचिन जगदाळे व वाहक एन.बी. गवळी हे तुळजापूर कडे जाणारी बस क्रमांक ( एम. एच .१२ सी. एच. ७७३३ ) ही बस नागोबा चौक येथे आली असता कारचालक धर्मेंद्र त्रिंबक शिंदे हे (एम.एच. १३ एम.९१६७) उस्मानाबादवरून वैरागकडे येत होते. मात्र दोघेही वळणावर आले असता बसचालकाने कार गाडीस चालकाच्या बाजूला जोराची धडक दिली. बसच्या वेगामुळे कार सुमारे पंधरा ते वीस फूट बसने फरफटत नेली.
सुदैवाने कार गाडीच्या एअर बॅग उघडल्याने कारचालकावरील मोठा अनर्थ टळला. बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. तपास पोलीस महेश पाडुळे करीत आहेत.