वैराग : मध्यम प्रकल्पाचा जलसेतू दुरुस्त करणाऱ्या जेसीबीवर दगड मारून काच फोडून चालकाला मारहाण करून खुनाची धमकी दिल्याचा प्रकार जवळगाव (ता. बार्शी) येथे घडला. याप्रकरणी वैराग पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत जवळगाव मध्यम प्रकल्पाचा डावा कालवा फुटला होता. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चारच्या सुमारास जलसंपदा विभागाच्या वाहनाचे ऑफरेटर दिनेश सुखदेव मदने (रा. कुंभेज, ता. माढा) हे जवळगाव प्रकल्पाचा डावा कालवा (साखळी क्रमांक ३ वर ७६०) हा जलसेतूचे काम करण्यासाठी हात्तीज गावाच्या शिवारात नागझरी नदीतील पुलाजवळील टिप्परमध्ये माती भरत होते.
यावेळी चार अनोळखी इसम आले. त्यांनी काही न बोलता नदीपात्रातील दगड घेत जेसीपीच्या काचेवर मारले. समोरची काच फोडली व त्या काचेचा तुकडा जेसीबी ऑपरेटरच्या डाव्या कपाळात घुसला. या प्रकाराबद्दल मारहाण करणाऱ्यांना विचारले असता प्रदीप देशमुख (रा. हत्तीज), असे नाव सांगत येथील माती उचलू नको, नाही तर संपूर्ण जेसीबी मशीन फोडून टाकेन, मारून टाकीन, अशी धमकी दिली. जखमी जेसीबी चालक दिनेश मदने यांनी चौघांविरोधात वैराग पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक जयवंत पेठकर करीत आहेत.