सोलापूर: खरीप हंगाम २०१८-१९ साठी राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती घोषित करुन शासनाने शालेय विद्यार्थ्यांना एस.टी.ची मोफत पास सुविधा जाहीर करुन अंमलात आणली. त्यानंतर दुष्काळ घोषित केलेल्या मंडलातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचेही परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय मंगळवारी राज्याच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांंतील विद्यार्थ्यांना होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेश झाला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण सोलापूर, मोहोळ, करमाळा, अक्कलकोट, माढा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आकारलेले परीक्षा शुल्क माफ होणार आहे.
यंदा सोलापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाने दगा दिल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील एकूण १८० तालुक्यांतील २६८ महसुली मंडलांमध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये परीक्षा शुल्कमाफीची योजना लागू झाली आहे. याबरोबरच यापुढे २०१८ मध्ये महसूल व वनविभागाने अन्य तालुक्यांमध्ये किंवा मंडलांमध्ये तेथीलही विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची योजना लागू होईल, असे उच्च तंत्र शिक्षण विभागाने परिपत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेल्या गावातील विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेने व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने कोणत्याही स्वरूपाचे परीक्षा शुल्क आकारू नये, असेही आदेशात म्हटले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शासनाने जाहीर केलेल्या तंत्र शिक्षणाच्या अधिपत्याखालील विद्यार्थ्यांना या परीक्षा शुल्क माफी योजनेचा लाभ होणार आहे.
पुरावा जोडणे बंधनकारक
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या गावातील रहिवासाचा पुरावा जोडून संबंधित संस्थेकडे देणे आवश्यक आहे. दुष्काळग्रस्त भागातील ज्या विद्यार्थ्यांकडून संबंधित संस्थेने परीक्षा शुल्क आकारले आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत करावे, असा आदेश शिक्षण संस्थांना शासनाने जारी केला आहे.
यांना पन्नास टक्के शुल्क माफच्जे विद्यार्थी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शुल्क माफ करावे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा फी भरली नसेल त्यांनी १५ दिवसात भरावी, असेही आदेशात म्हटले आहे.