सौरभ ५४ तासांनंतरही सापडेना शोधपथकाला
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहोळ : चार महिन्यांपूर्वी विवाह होतो... सहचरणीसोबत अनेक स्वप्ने रंगविणारा युवक सहकाऱ्यांसोबत गणरायाच्या प्रतिष्ठापनेत सहभागी होताे... दीड दिवसाच्या लाडक्या श्रीला निरोप देताना पाण्यात उतरतो अन् नदीपात्रात बुडतो... रविवारी ५५ तासांनंतरही तो बचावकार्य पथकाच्या हाती लागत नाही.
कोळेगाव येथील छोट्याशा कामगार वसाहतीवर शोककळा पसरविणारी ही दुर्दैवी घटना आहे सौरभ सुभाष बेंबळघे (वय १८, रा. लातूर) या युवकाची. ११ सप्टेंबर रोजी दीड दिवसाचा गणपती विसर्जन करताना आष्टे बंधाऱ्यावर सीना नदीपात्राच्या परिसरात ही घटना घडली.
या परिसरात रेल्वेच्या स्लिपर फॅक्टरीतील पाण्यात वाहत गेलेला तरुण बुडून ३६ तास उलटून गेले. बचावकार्याच्या पथकाला तो अद्याप हाती लागलेला नाही. दरम्यान १२ सप्टेंबर रोजी दिवसभर कोळेगावच्या आठ मच्छीमारांनी आष्टे-लांबोटीदरम्यान नदीपात्रात त्याचा शोध घेतला.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार रेल्वे रुळांसाठी लागणारे सिमेंट पोल तयार करण्याचा कारखाना मोहोळ तालुक्यात कोळेगाव येथे आहे. या कारखान्यातील कामगारांवर तो सुपरवायझिंग करायचा. मागील चार महिन्यांपासून कोळेगाव वसाहतीतील कामगारांसोबत तो पत्नी आणि चुलत भावासोबत राहत होता. येथील कामगार गणेशोत्सवानिमित्त एकत्रित आले. त्यांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. त्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सात ते आठ कामगार शनिवारी (दि. ११) दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान आष्टे बंधाऱ्याजवळ आले. गणरायाला निरोप देण्यासाठी खडकावरून पाण्यात उतरले. दरम्यान, सौरभ पाण्यात बुडाला. तो बुडताना पाहून घाबरून सोबतचे कामगार पळाले. त्यांनी मोहोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. तसेच काही स्थानिकांना वाचवण्यासाठी आवाहन केले. ही घटना समजताच होमगार्ड दत्तात्रय मोटे याने मच्छीमारांच्या मदतीने आष्टे बंधारा-कोळेगावच्या हद्दीपर्यंत सौरभचा शोध घेतला. तो सापडला नाही. शनिवारी रात्री अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवावी लागली.
---
सहा किलोमीटर नदीपात्रात घेतला शोध
मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार युसुफ शेख, होमगार्ड मोटे हे रविववारी १२ सप्टेबर रोजी दिवसभर नदीपात्र परिसरात शोध घेतला. लक्ष्मण मल्लाव, दत्ता भोई, बालाजी भोई, ज्ञानेश्वर भोई, तुकाराम भोई, दीपक भोई, दत्तात्रय मल्लाव, सोमनाथ वाघमोडे या कोळेगावच्या आठ मच्छीमारांनी सीना नदीपात्रात आष्टे बंधा-यापासून लांबोटी गावापर्यंत सुमारे सहा किलोमीटर नदीपात्रात शोध घेतला. रविवारी सकाळपासून थर्माकॉल, पाण्यातले ट्यूब याच्या सहाय्याने शोध कार्य चालू राहिले. परंतू अद्याप त्या युवकाचा मृतदेह हाती लागलेला नाही.
---
चार महिन्यापूर्वी झाला होता विवाह
चार महिन्यापूर्वीच सौरभचे लग्न झाले होते. नवरा-बायको मोहळ मध्येच फॅक्टरी परिसरातच राहत होते. घटनेची खबर मिळताच सौरभचे आई-वडील नातेवाईक, सासरे, मोहळमध्ये दाखल झाले. सर्वजण सौरभच्या शोधात आहेत.
---
शोधकार्यासाठी मागितली रेस्क्यू टीम
तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी सौरभच्या घरी भेट देऊन त्याची पत्नी व नातेवाईकांचे सांत्वन केले. नदीपात्रामध्ये वाहून गेलेल्या सौरभ चा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनची टीम देण्यात यावी अशी मागणी राजशेखर लिंबारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एका पत्रांव्दारे केली आहे.
---
फोटाे :
१२ सौरभ
१२ मोहोळ डॅम्प