पंढरपूर : ‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान।आणिक दर्शन विठोबाचे।।हेचि घडो मज जन्मजन्मांतरी।मागणे श्रीहरी नाही दुजे।।’ या संत वचनाप्रमाणे चंद्रभागा स्नानाला अधिक महत्त्व आहे़ पंढरीत दाखल होताच भाविकांची पावले आपोआपच चंद्रभागेकडे वळतात़ सध्या चंद्रभागा नदीपात्रात भरपूर पाणी आहे़ त्यामुळे पहाटेपासून भाविकांची चंद्रभागा वाळवंटी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी दाटी होताना दिसून येत आहे.
यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने चंद्रभागा नदीत पाणी कमी होण्याची शक्यता होती़ मात्र मे महिन्यात सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते़ ते पाणी औज बंधाºयात पोहोचताच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गोपाळपूर येथील बंधारा पूर्णपणे अडविला.
शिवाय मंदिर समितीचे कर्मचारी २४ तास खडा पहारा करीत आहेत़ त्यामुळे सध्या चंद्रभागा नदीपात्रात भरपूर पाणी आहे़ शिवाय वाळवंटातील श्री भक्त पुंडलिकासह अन्य मंदिरांनाही पाण्याने वेढा दिला आहे.
शुक्रवारी आषाढी वारी सोहळा असल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून पंढरीत भाविकांचे जत्थेचे जत्थे दाखल होत आहेत़ हे वारकरी पंढरीत आल्यानंतर मठात साहित्य ठेवून प्रथम चंद्रभागेत स्नान करण्यास प्राधान्य देतात़ गुरुवारी पहाटे तर चंद्रभागेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती़ पवित्र स्नान झाल्यानंतर भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात़ त्यानंतर दर्शन रांगेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत सहभागी होताना दिसून आले.
महाद्वार घाटावर भाविकांची गर्दी़...- चंद्रभागेत पवित्र स्नान केल्यानंतर वाळवंटात हरिनामाचा गजर करून दर्शन रांगेकडे जाताना महाद्वार घाटावर भाविकांची गर्दी होत होती़ तसेच भाविक दत्त घाट, कासार घाट, विप्रदत्त घाट येथून जाण्यापेक्षा महाद्वार घाटाचाच वापर करीत असल्याने त्या ठिकाणी गर्दी दिसून आली़ त्यामुळे चंद्रभागेत स्नानासाठी जाणारे आणि स्नान करून दर्शन रांगेकडे जाणाºया भाविकांची वेगळी रांग करण्यात आली होती़ पोलीस गर्दीवर नियंत्रण ठेवत भाविकांना सतत सूचना देत त्यांच्या सुरक्षिततेचही काळजी घेत असल्याचे दिसून आले़