पंढरपूर : नीरा नदीतून २२ हजार ९८० क्युसेकचा विसर्ग संगम येथे भीमा नदीपात्रात मिसळत असल्याने पंढरपुरातील चंद्रभागेतील पाणी पातळीतही वाढ झाली आहे़ त्यामु*ळे भक्त पुंडलिक मंदिरासह अनेक समाधी आणि मंदिरांना पाण्याने वेढा टाकला आहे. दरम्यान वाढलेल्या पाण्यामुळे भाविकांनी नौकाविहाराचा आनंद लुटला.
आषाढी वारी संपल्यानंतरही चंद्रभागा नदीपात्रात पाणी शिल्लक होते़ त्यात १ आॅगस्ट रोजी नीरेच्या पाण्याची भर पडली़ त्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे़ वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत असल्यामुळे ३१ जुलै रोजी वीर धरणातून जवळपास १८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी केला होता; मात्र त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता त्यात वाढ करून ५ दरवाज्यातून २२ हजार ९८० क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले होते़ त्यामुळे पाण्याचा वेग कायम राहिल्याने दोनच दिवसात पाणी चंद्रभागा पात्रात मिसळले़
चंद्रभागा नदीपात्रात भरपूर पाणी आल्याने नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे़ पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले भाविक पाणी भरपूर असल्याचे पाहून नौका विहाराचा आनंद घेताना दिसून आले़ आषाढीसाठी मे महिन्याच्या अखेरीस गोपाळपूरचा बंधारा पूर्ण क्षमतेने अडविण्यात आला होता़ तेव्हापासून म्हणजेच जवळपास दोन महिने पाणी चंद्रभागेत होते़ दरम्यान, आषाढी वारीत तर लाखो भाविकांनी पवित्र स्नान केले होते़
सोलापूर जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस पडला नाही़ त्यामुळे अद्यापही दुष्काळसदृश स्थिती आहे़ नीरेतून भीमा नदीत पाणी आल्याने त्याचा माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकºयांना लाभ होणार आहे़ पावसाअभावी आणि नदीपात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांतील ऊस लागवड व कांदा लागवड रखडली होती; मात्र भीमा नदीत पाणी आल्याचे कळताच आता ऊस, कांदा लागवडींना वेग येणार आहे़ शिवाय पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांनाही जीवदान मिळणार आहे़
- १ आॅगस्ट रोजी सकाळी नीरेचे पाणी चंद्रभागा नदीत आले़ दुपारी १२ वाजेपर्यंत नदीपात्र भरले़ त्यानंतर नदी दुथडी भरून वाहू लागली़ परिणामी चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरासह अन्य छोटी मंदिरे व समाधी यांना पाण्याने वेढा मारला होता़ शिवाय स्नान केल्यानंतर महिलांसाठी उभारलेल्या चेंजिंग रुमलाही पाण्याने वेढा दिला आहे़ ती निम्म्यापेक्षा जास्त पाण्यात आहे़